“कोते येथील आश्रमशाळेच्या नर्सरीतील वृक्षांची बेसुमार कत्तल” ग्रामस्थांचा आरोप

धामोड प्रतिनिधी : प्रतिश पाटील
कोते (ता. राधानगरी) येथे आदिवासी विकास विभागाची माध्यमिक आश्रमशाळा असून, या ठिकाणी पाचवी ते दहावीचे वर्ग आहेत. येथील शाळा व्यवस्थापन कमिटीकडे गट नंबर १४८ मधील १५ हेक्टर जमीन आहे. या शाळेने १९८५ साली या जमिनीवर ७००० आॅस्ट्रेलियन बाभळीचे वृक्ष लागवड केली होती. लागवड केलेले काही वृक्ष जीर्ण झाले असून, यापैकी तेराशे जीर्ण वृक्ष तोडण्याची परवानगी आदिवासी विकास विभागाने दिली आहे. त्याजागी नवीन वृक्षांची लागवड व संगोपन करण्याचेही या आदेशात नमूद केले आहे.
शाळा कमिटी व मुख्याध्यापकांनी मुलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने शाळे सभोवतालच्या वनीकरणातील जीर्ण झालेल्या झाडांची तोड करण्याच्या दृष्टीकोनातुन आदिवासी विकास प्रकल्प घोडेगाव जिल्हा पुणे कार्यालयाकडे शाळा आवारातील जीर्ण झालेल्या वृक्षांची तोड करण्याची मागणी केली होती. तसेच झाडे जीर्ण असल्याबाबतचा परिक्षेत्र वन अधिकारी राधानगरी यांचा सर्व्हेक्शन अहवाल सोबत जोडला होता. असे मुख्याध्यापकांनी स्पष्ट केले आहे.
त्यानुसार आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी आर. बी. पांढुरे यांनी सदर वनीकरणातील तेराशे जीर्ण वृक्षांची तोड करण्याची परवानगी दिली. त्यानंतर मुख्याध्यापक व शाळा व्यवस्थापन समिती यांनी निविदा मागवून जय मल्हार टिंबर्सचे मालक मधुकर चौगुले (रा.कौलव) यांना ठेका दिला.
एकुण १३०० जीर्ण वृक्षांची ४८१००० रुपयांची रक्कम भरून घेतली. पैकी दहा टक्के रक्कम सामाजिक वनीकरण विभाग राधानगरी यांच्याकडे भरल्यानंतर रीतसर झाड तोडीला परवानगी मिळाली. सध्या या नर्सरीतील जीर्ण झालेले, कीड लागलेली, पडझड झालेल्या वृक्षांची तोड सुरू असून, ४७० ऑस्ट्रेलियन बाभूळ जातीचे जीर्ण वृक्ष तोडले आहेत. शाळा सुरू होण्यापूर्वी हे काम पूर्ण करण्याची अटही या आदेशात घालण्यात आली आहे.
“जीर्ण झाडांबरोबर चांगल्या वृक्षांचीही कत्तल. ग्रामस्थांचा आरोप…..
दरम्यान शाळा प्रशासनाने व ठेकेदाराने संगनमताने सुमारे एक महिन्यापासुन जीर्ण झाडांबरोबर चांगल्या वृक्षांचीही कत्तल केली असल्याचे प्रसार माध्यमांसमोर स्पष्ट केले आहे. तशी प्रत्यक्ष कबुलीच सहठेकेदार रामराव फास्के यांनी दिली आहे. सगळ्याच गोष्टी सांगायच्या नसतात, कोरोनाकाळ असलेने खर्चासाठी दोन ट्रक नेलेचे त्यांनी सांगितले आहे. आता किती माल ट्रक नेले याचा हिशेब व तारतम्य याचा “अर्थ” पुर्ण चौकशीनंतरच समजणार आहे. सदर ठेकेदाराने उन्मळुन पडलेल्या झाडांसोबत जिंवत झाडेही तोडली आहेत . या प्रकारात सदर ठेकेदारावर दंडात्मक व फौजदारी कारवाई झाली पाहीजे अशी मागणी होत आहे .या प्रकारात फार मोठा आर्थिक व्यवहार शाळा मुख्याध्यापक श्री डी .पी .पाटील व ठेकेदार यांच्यात झाला असल्याची चर्चा आसपासच्या गावातील ग्रामस्थांतुन होत आहे . मागील काही वर्षात वाळून खाली पडलेली जळाऊ लाकडे गुरे चारण्यासाठी येणाऱ्या महीला घेवून जातात त्या वेळेस संबधीत मुख्याध्यापक यांच्याकडुन दंडात्मक कारवाई व फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल केले जातात . पण या वनराईतील जिवंत झाडांच्या झालेल्या कत्तलीबदल मुख्याध्यापक यांनी कोणती कारवाई का केली नाही ? ठेकेदारास संबंधीत मुख्याध्यापक सामील आहेत का ? वृक्ष तोड सुरू असताना मुख्याध्यापक यांनी जबाबदारीने लक्ष का दिले नाही ?असे अनेक प्रश्न ग्रामस्थांतुन विचारले जात आहेत .
शासनाकडून “झाडे लावा झाडे जगवा” ही मोहीम सुरु असताना अशी जिवंत झाडांची कत्तल करणे ही बाब निंदनीय आहे सदर प्रकरणाची चौकशी होवून संबधीत दोषीवर कारवाई व्हावी अशी मागणी होत आहे .
शाळा प्रशासन व ठेकेदार यांना उन्मळुन पडलेली व जीर्ण झालेल्या झाडांचाच ठेका मिळाला असुन जीर्ण झाडांसह बहुतांशी चांगली झाडेही तोडली आहेत आणि हे शंभर टक्के चुकीचे आहे. उन्मळुन पडलेल्या झाडाचा बुंधा व चांगल्या झाडाचा बुंधा किंवा उभे झाड व आडवे झालेले झाड यातील फरक कोणीही सांगु शकेल.
– सुभाष आरबुणे, ग्रामस्थ (गोतेवाडी ता.राधानगरी)
परवानगी घेवुनच वृक्षतोड केली आहे. काही झाडांवर नंबर टाकलेले नाहीत ते मी मान्य करतो.तसेच वाटेसाठी काही चांगली झाडे तोडली आहेत शाळा परिसरातील नर्सरीमध्ये मुलांची सतत वर्दळ, ये-जा व खेळण्या बागडणे असते. नर्सरीतील झाडे खूपच जीर्ण झाली असून, तसेच विषारी साप, किटक यांचे येथे वास्तव्य असलेने विद्यार्थ्यांच्या सुरक्षितततेच्या कारणास्तव या झाडांच्या तोडीचा प्रस्ताव केला होता. मंजुरी घेऊनच रीतसर तोड सुरु केली आहे.
-डी. पी. पाटील, मुख्याध्यापक
सहठेकेदार रामराव फास्के यांनी अनावधानाने असे विधान केले असुन उन्मळुन पडलेली, किड वाळवी लागलेली एकुण १३०० झाडांचा ठेका मला मिळाला आहे. एकुण ४७० झाडे आतापर्यंत तोडलेली आहेत. उन्मळुन पडलेल्या झाडांच्या फांद्या या चांगल्या वृक्षांवर पडतात व तेही झाड कोसळते, निव्वळ अशीच झाडे आम्ही तोडलेली आहेत.
– मधुकर चौगुले, ठेकेदार(कौलव ता.राधानगरी)