कोल्हापूरचे माजी वरिष्ठ संशोधक अधिकारी डॉ.जे.पी.पाटील यांच्या ‘प्रगत ऊस उत्पादक तंत्रज्ञान’ या पुस्तकाचे प्रकाशन.
सर्व शेतकरी बांधवासाठी हे पुस्तक एक पर्वणी ठरेल - ना. सतेज (बंटी) डी. पाटील, पालकमंत्री, कोल्हापूर

प्रतिनिधी : अक्षय घोडके
प्रादेशिक ऊस व गुळ संशोधन केंद्र, कोल्हापूरचे माजी वरिष्ठ संशोधक अधिकारी डॉ. जे. पी. पाटील यांनी ऊस संशोधनावरील तब्बल ४५ वर्षांच्या प्रदीर्घ अनुभवाच्या तपस्येतून साकारलेल्या ‘प्रगत ऊस उत्पादक तंत्रज्ञान’ या पुस्तकाचे प्रकाशन आज पालकमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या हस्ते व सिद्धिगिरी काडसिद्धेश्वर स्वामी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये करण्यात आले.

डॉ.जे.पी.पाटील यांच्या ‘प्रगत ऊस उत्पादक तंत्रज्ञान’ पुस्तक आपल्याला अत्यंत सरळ आणि सोप्या भाषेमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोनातून फायद्याची ऊस शेती कशी करायची? हे शिकवते. त्यांच्या आजवरच्या अनुभवातील निरीक्षण आणि प्रयोगातून सिद्ध केलेली सर्व माहिती सर्वसामान्य शेतकरी बांधवांसाठी या पुस्तकाच्या माध्यमातून उपलब्ध झाली आहे.
लोकसंख्या वाढत असली तरी, जमिनीचे क्षेत्र आहे तितकेच राहणार आहे. त्यामुळे, नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून, शेतकऱ्यांनी कमी क्षेत्रात अधिक उत्पन्न घेण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये हेक्टरी सरासरी 97 टन उसाचे उत्पादन निघत असून हे उत्पादन 125 टना पर्यंत कसे पोहचेल यासाठी आम्ही प्रयत्नशील असून याबाबत ठोस पाऊले उचलत आहोत असे पाटील म्हणाले.
या पुस्तकातून पाटील सरांनी ऊसासाठी जमिनीची निवड कशी करावी? ते हवामान बदलाचे (जास्त पाऊस, गारपीट, दुष्काळ) पिकावर होणारे परिणाम व त्यावरील उपाय इथेपर्यंत अत्यंत लहान-सहन गोष्टींबाबत मार्गदर्शन केले आहे. आपल्या सर्व शेतकरी बांधवासाठी हे पुस्तक एक पर्वणी ठरेल.
या कार्यक्रमावेळी गोकुळचे माजी संचालक अरुण नरके, डॉ. संदिप पाटील, सागर पाटील, डॉ. बाळासाहेब देसाई, डॉ. नेताजी पवार, कृषिरत्न डॉ. संजीव माने, वैशाली पाटील आदी उपस्थित होते.