वारकरी संप्रदायातील अध्वर्यू, प्रवचनकार,कीर्तनकार ह.भ.प.भानुदास महाराज यादव यांचे देहावसान.

कोल्हापूर : येथील वारकरी संप्रदायातील अध्वर्यू, सुप्रसिद्ध प्रवचनकार,किर्तनकार, ह.भ.प.भानुदास महाराज यादव (वय ६५ वर्षे,) यांचे कोरोनामुळे देहावसान झाले.वैंकुठवासी ब्रम्हीभूत गुरुवर्य रामचंद्र महाराज यादव यांचे ते सुपुत्र होत. त्यांच्या पश्चात त्यांनी कोल्हापूर व पंढरपूर मठाचे उत्तराधिकारी म्हणून पारमार्थिक परंपरा जतन केली होती. गुरुवर्य साखरे महाराज संपादीत सार्थ ज्ञानेश्वरी, विचार सागर, सार्थ अमृतानुभव,सार्थ चांगदेव पासष्टी यासारख्या अनेक ग्रंथांचे त्यांनी पुनः संपादन व प्रकाशन केले होते.आपल्या किर्तन, भजन व प्रवचनातून त्यांनी सातत्याने समाज प्रबोधन केले. कोल्हापूर जिल्ह्यातील वारकरी संप्रदायाचे ते प्रमुख होते.करवीर काशी फौंडेशनचे प्रमुख सल्लागार म्हणून गेली २०वर्षे ते सांस्कृतिक-सामाजिक चळवळीत सहभागी होते. वारकरी साहित्य परिषदेचा जीवन गौरव पुरस्कार, ह.भ.प.बाबा महाराज सातारकर यांच्या हस्ते वारकरी जीवन पुरस्कार,व स्वामी अमलानंद भक्त मंडळाचे वतीने स्वामी अमलानंद सेवा पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले होते.कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक वारकरी दिंडींचे ते मार्गदर्शक होते.
त्यांच्या मागे पत्नी,भाऊ ह.भ.प.महादेव तथा बंडा महाराज,पुतणे,बहिणी,मेव्हूणे, भाचे असा बराच मोठा सांप्रदायिक परिवार आहे.