गोरगरीब जनतेच्या जीवनात चांगले दिवस आणण्यासाठीच एकत्र : ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचे प्रतिपादन; म्हाकवेत २६ कोटीच्या कामाचे लोकार्पण व शुभारंभ

कागल प्रतिनिधी :
गोरगरीब,कष्टकरी,श्रमजीवी,दिनदलितांच्या जीवनात सुखसमाधान आणि आनंदाचे दिवस यावेत या शुध्द आणि प्रामाणिक हेतूने संजयबाबा आणि आम्ही एकत्र आलो आहोत. आम्हा दोघांचे ध्येय एक असून त्याच्या पुर्तीसाठी साथ द्या. असे आवाहन ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.
म्हाकवे (ता.कागल) येथिल ग्रामसचिवालयाच्या पायाभरणीसह विविध २६ कोटी विकास कामांच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी आमदार संजयबाबा घाटगे होते.
यावेळी संजयबाबा घाटगे म्हणाले, अन्नपूर्णा कारखान्याच्या उभारणीसाठी आम्ही खस्ता खाल्ल्या असल्या तरी त्यावर शिखर चढविण्याचे काम ना.मुश्रीफ यांनी केले असल्याची प्रांजळ कबुली दिली.
सरपंच सुनिता चौगुले यांनी स्वागत तर शिक्षकनेते जी एस पाटील यांनी प्रास्ताविक केले. यावेळी जिल्हा बँकेचे संचालक भैय्या माने, गोकूळचे संचालक अंबरिष घाटगे यांनी मनोगते व्यक्त केले. जिल्हा परिषद सदस्य युवराज पाटील, प्रविणसिंह भोसले, रवींद्र पाटील, उद्योगपती एस. के. पाटील, बंडोपंत पाटील, सुजाता सावडकर, रणजित मुडूकशिवाले, ए.वाय पाटील, रमेश पाटील आदी उपस्थित होते. एच एन पाटील यांनी आभार मानले.
“अशक्य ते शक्य करतील……”
कागल तालुक्यातील विकास कामांचा आढावा घेताना अंबरिष घाटगे यांनी नामदार मुश्रीफ यांचा उल्लेख अशक्य ते शक्य करतील स्वामी असा केला. गावागावात आता लाखांचा नव्हे तर कोटींचा निधी मिळत आहे. एकही काम शिल्लक राहू नये, यासाठी ना. मुश्रीफ यांची धडपड सुरू आहे.
“कार्यकर्त्यांना मिळतोय गारवा……”
माजी आमदार संजयबाबा घाटगे म्हणाले, फार मोठी सत्ता नसल्यामुळे लोकांची कामे करु शकलो नाही, याची खंत आहे. परंतु, ना.मुश्रीफ यांनी हा पश्चाताप भरून काढला आहे. निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या जोरावर राजकीय अस्तित्व टिकून राहिले. कार्यकर्त्यांना याचे चटके सहन करावे लागले मात्र,आता मुश्रीफांच्या सानिध्यामुळे त्यांना थोडा गारवा मिळाला आहे. त्यामुळे यापुढील सर्व निवडणूकीत मुश्रीफ यांच्या पाठिशी राहून त्यांच्या मागे विक्रमी मताधिक्य उभे करुया, असा निर्धारही संजयबाबा घाटगे यांनी व्यक्त केला.