मराठा समाजासाठी हा स्वाभिमानाचा लढा : प्रकाश आंबेडकर

कोल्हापूर प्रतिनिधी : रोहन भिऊंगडे
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूरमध्ये पहिल्या मूक आंदोलनाला सुरुवात झाली आहे. खासदार संभाजीराजे यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केले. त्यानंतर राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या समाधीला अभिवादन करून मराठा क्रांती मूक आंदोलनास सुरुवात झाली आहे. पाऊस असताना देखील या आंदोलनाला मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचं चित्र समोर येत आहे.
वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर मराठा क्रांती मुक आंदोलनात सामील झाले आहे. ‘ज्या समाजाने लढा दिला नाही, त्यांच्या हातात शिवाजी महाराजांनी तलवार दिली, स्वाभिमानाने लढा देण्याचं शिकवलं. आज मराठा समाजाचे आंदोलन होत आहे. मराठा समाजासाठी हा स्वाभिमानाचा लढा आहे.’, असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. प्रकाश आंबेडकर आपल्या कार्यकर्त्यांसह आंदोलनामध्ये सहभागी झाले आहेत.
प्रकाश आंबेडकर यांच्यासह, धैर्यशील माने, प्रकाश आवाडे, पालकमंत्री सतेज पाटील,संजय मंडलिक , विनय कोरे, प्रकाश अबिटकर, चंद्रकात जाधव, ऋतुराज पाटील, विनय कोरे, राजू आवळे यांच्यासह अन्य लोकप्रतिनिधी उपस्थित होते.या आंदोलनात या सर्व लोकप्रतिनिधीनी मराठा समाजाच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.
मराठा सरकारला पुन्हा आरक्षण मिळेपर्यंत आणि आधीच्या सरकारने दिलेल्या सर्व सवलती पुन्हा मिळेपर्यंत होणाऱ्या सर्व आंदोलनाला आमचा पाठिंबा, असं यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले. चंद्रकांत पाटील यांनी पाठिंब्याचं निवेदन संभाजीराजे छत्रपतींना देलं आहे.