” गोकुळ “मध्ये राजे गटास प्रतिनिधित्व मिळालेच पाहिजे तालुक्यासह जिल्ह्यातील १०० हून अधिक ठराव धारकांनी केला निर्धार आम्हाला गृहित धरू नका, अन्याय झालेस आम्हाला आमचा मार्ग मोकळा राजे गटाच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात संतप्त भावना

कागल प्रतिनिधी.
होऊ घातलेल्या गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत राजे गटास प्रतिनिधित्व मिळालेच पाहिजे.आमच्या गटाला कोणी गृहीत धरून चालत असल्यास ते खपवून घेतले जाणार नाही.
कागल तालुक्यासह जिल्ह्यातील 100 हून अधिक ठरावधारकानी यासाठी पक्का निर्धारच केला आहे.या अटीतटीच्या निवडणुकीमध्ये आमची मते निश्चितच निर्यायक ठरु शकतात.
योग्य सन्मान न झाल्यास आमचा मार्ग मोकळा आहे. अशा तीव्र भावना राजे गटाच्या कार्यकर्त्यांच्या गोकुळ निवडणुकीसाठी झालेल्या मेळाव्यात कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या. कागल येथे राजे गटाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा झाला.अध्यक्षस्थानी शाहू साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन अमरसिंह घोरपडे होते.
प्रा.सुनील मगदूम म्हणाले, म्हणाले,शाहू साखर कारखान्याचे संस्थापक स्व. राजे विक्रमसिंह घाटगे यांनी केवळ जिल्ह्यातीलच नव्हे तर देशातील सहकार क्षेत्राला दिशा देण्याचे काम केले आहे. त्यांचाच वारसा राजे समरजितसिंह घाटगे चालवीत आहेत.शाहू ग्रुपचा पारदर्शी कारभाराच्या अनुभवाचा गोकुळ मध्ये निश्चितच फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. यासाठी त्यांच्या विचारांचा प्रतिनिधी गोकुळमध्ये असणे आवश्यक आहे.
यावेळी संजय पाटील बेळवळेकर म्हणाले, आमचे नेते राजे समरजितसिंह घाटगे यांच्या नेतृत्वाखाली राजे गट राजकारणात सक्रिय झालेला आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषद,पंचायत समिती,नगरपालिका, ग्रामपंचायत निवडणुकामध्ये विरोधात प्रबळ प्रतिस्पर्धी असूनही राजे गटाने आपले वेगळे अस्तित्व दाखवले आहे. विधानसभेच्या निवडणुकीला ९० हजारहून अधिक भरघोस मते मिळाली आहेत.जी राज्यातील अपक्ष उमेदवारांमध्ये प्रथम क्रमांकाची आहेत .या सगळ्याचा विचार करता जिल्ह्याच्या आर्थिक व राजकीय दृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या गोकुळमध्ये राजे गटास प्रतिनिधित्व मिळणे क्रमप्राप्त आहे.आमच्या गटाला प्रतिनिधित्व मिळालेच पाहिजे.
बिद्रीचे माजी संचालक सुनीलराज सूर्यवंशी म्हणाले, गोकुळच्या निवडणुकीमध्ये राजे समरजितसिंह घाटगे यांनी त्यांचा स्वतःचा किंवा त्यांच्या कुटुंबातील कोणाचाही उमेदवारी अर्ज दाखल केलेला नाही. काही कार्यकर्त्यांची सौ नवोदिता वाहिनीसाहेब याना राजे गटांची उमेदवारी घेणेबाबत इच्छा व्यक्त केली होती पण समरजितराजेंनी सर्वसामान्य कार्यकर्त्यांना संधी मिळावी म्हणून सर्वसामान्य कार्यकर्त्यांना संधी देणेचा निर्णय घेतला. समरजितसिंह घाटगे यांची सर्वसामान्य कार्यकर्त्यांना न्याय देण्याची भूमिका कौतुकास्पद आहे. त्याला सत्ताधारी आघाडीच्या नेत्यांनी पाठबळ देण्याची गरज आहे.
राजे बँकेचे चेअरमन एम पी पाटील म्हणाले , गोकुळ दूध संघ व राजे गट यांचे फार पूर्वीपासून जुने नाते आहे. स्व.राजे विक्रमसिंह घाटगे यांनी सातत्याने या संघाच्या प्रगतीपथावरील वाटचालीत मार्गदर्शन केले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक सामान्य कार्यकर्त्यांना संधी देण्याचे काम झाले आहे.गतवेळी या निवडणुकीच्या धामधुमीत दुर्दैवाने त्यांचे अकाली निधन झाले. यावेळी सुद्धा राजे गटास प्रतिनिधित्व देणेबाबात चर्चा झाली होती. मात्र या दुर्दैवी घटनेमुळे गोकुळच्या संधी पासून लांब राहावे लागले. राजेसाहेब यांचे अपुरे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी राजे गटाला प्रतिनिधित्व द्यायलाच हवे.
शाहूचे उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे अध्यक्षिय मनोगतात म्हणाले, सर्व कार्यकर्त्यांच्या भावना पाहता राजे गटास प्रतिनिधित्व मिळालेच पाहिजे हा सूर दिसतो.गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीबाबत भाजपच्या वतीने जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळणारे राजे समरजितसिंह घाटगे हे चर्चा करतील. असे जाहीर वक्तव्य चंद्रकांतदादा पाटील यांनी केले आहे. मात्र सत्ताधारी गटाकडून कोणत्याही पद्धतीने या निवडणुकीत आमच्या गटाला विश्वासात घेण्यात आलेले नाही. किंवा राजे गटास योग्य प्रतिनिधित्व देण्याबाबत कोणतीही सकारात्मक चर्चाही करण्यात आलेली नाही. याचा अर्थ ते आम्हाला गृहीत धरत आहेत. असाच होतो. परंतु आम्हाला जर कोण गृहीत धरून योग्य सन्मान करणार नसेल तर आम्हाला आमचा मार्ग मोकळा राहील.
यावेळी बिद्री चे संचालक दत्तामामा खराडे म्हणाले,राजे गट आता केवळ पाठिंबा देणारा गट राहिला नाही.सौ नवोदिता वाहिणीसाहेब याना थांबवुन सर्वसामान्य कार्यकर्त्याला संधी देणेचा निर्णय त्यांनी घेतला आहे.सत्ताधारी मंडळींनी याचा गांभीर्याने विचार करावा.
यावेळी शाहू चे संचालक बॉबी माने,बाबगोंडा पाटील प्रताप पाटील, सावर्डे बु धनंजय पाटील ,म्हाकवे यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या .आभार उत्तम पाटील बाचणी यांनी मानले.
आम्ही आता ऐकण्याच्या मनस्थितीत नाही…………..आम्हा ठराव धारकांच्या भावना योग्य ठिकाणी कळवा……………
शाहू साखर कारखान्याचे संचालक युवराज पाटील म्हणाले, मागील तीन निवडणुकीत राजे गटावर अन्याय झालेला आहे. राजे गटाचा प्रतिनिधी गोकुळमध्ये नसल्यामुळे आम्हाला मानणाऱ्या दूध संस्था आणि दूध उत्पादकांची बऱ्याच वेळा कुचंबना होत असते.प्रसंगी अडवणुक होते. त्यामुळे दुसऱ्यांचे उंबरे झिजविण्याची वेळ येते. त्यामुळे काहीही झाले तरी आमच्या गटाला प्रतिनिधित्व मिळालेच पाहिजे. ती आमच्या गटाच्या दूध उत्पादकांसह सर्वसामान्य कार्यकर्त्यांची आग्रही मागणी आहे आम्ही आत्ता ऐकण्याच्या मनस्थितीत नाही.आम्हा ठराव धारकांच्या भावना योग्य ठिकाणी कळवा आणि आमच्या गटासाठी न्याय मागा