लॉकडाऊनच्या काळात निराधारांना मिळतोय आधार; मत्तीवडेच्या अमर पोवार यांचा उपक्रम

कोगनोळी :
कोरोनाच्या महामारीमुळे देश लॉकडाऊन करण्यात आला. उद्योगधंदे ठप्प झाल्याने अनेकांचे रोजगार बुडाले. उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला. अशाही काळात मत्तीवडे ता. निपाणी येथील अमर पोवार हे मात्र समाजात बेवारस स्थितीत फिरणाऱ्या निराधारांना आपल्यातीलच एक घास देऊन आधार देण्याचा प्रयत्न करत आहेत. या त्यांच्या कार्याला समाजातील दानशूरांनी पुढे येऊन बळ देण्याची गरज आहे.
अमर पोवार हे भारतीय समाज सेवा या संस्थेच्या माध्यमातून रस्त्याने फिरत येणाऱ्या बेवारस फिरस्त्यांना घरी घेऊन येतात. त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी जाणून घेऊन त्यांच्या कुटुंबाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जातो. आज पर्यंत 35 निराधार व्यक्तींना त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींकडे सुपूर्द करण्यात आले आहे. आजही त्यांच्या घरी फलटण, कोल्हापूर, निपाणीसह इतर राज्यातून बेवारस स्थितीत फिरत आलेल्या एका महिलेसह आठ निराधार व्यक्ती आहेत. लॉकडाउनच्या काळात स्वतःच्याच उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर असताना सुद्धा अमर पोवार हे अशा निराधार व्यक्तींना आधार देण्याचे काम करीत आहेत. यासाठी ते अनेक देणगीदारांशी संपर्क करीत आहेत. याची माहिती मिळताच कोगनोळी येथील प्रणय सांगरोळे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त रणजीत माणकापूरे, चेतन देसाई, रोहित माणकापूरे, प्रितम सांगरोळे, प्रसन्ना वठारे, शितल माणकापूरे, शुभम मगदूम यांच्या उपस्थितीत जीवनावश्यक वस्तू निराधारांसाठी भेट दिल्या.
केक कापूनच वाढदिवस साजरा होतो असे नाही खरोखरच अन्नाची गरज असणाऱ्या अशा गरजूंच्या तोंडात वाढदिवसानिमित्त दोन घास घालता आले याचा नक्कीच आनंद आहे.
……………प्रणय सांगरोळे
माझीही परिस्थिती बेताचीच आहे. तरीही या समाजातील निराधारांना आधार देण्याचा प्रयत्न करीत आहे. समाजातील दानशूरांनी पुढे येऊन माझ्या या कार्यास बळ देण्याची आवश्यकता आहे.
…………… अमर पोवार