उडदाचे डांगर आहारातून गायब ; बदलत्या जीवनशैलीचा परिणाम
कुडूत्री प्रतिनिधी : सुभाष चौगले
सध्याची बदलती जीवनशैली,आणि पावलोपावली वाढत जाणाऱ्या हॉटेल संस्कृतीच्या जमान्यात काही पारंपरिक आणि जुन्या काळातील आहारातील खाद्य पदार्थ नाहीसे झाले आहेत. जुनं ते सोनं असतं या म्हणीनुसार डांगर हे शरिरासाठी पोषक आणि सात्विक असतं असं पारंपरिक काळातील उडीद डाळीच्या पिठापासून तयार होणारे डांगर काळाच्या ओघात नाहीसे झाले आहे.आणि त्याची जागा अन्य खाद्य पदार्थांनी घेतली आहे.
मागील काही वर्षाचा विचार करता किंवा आजोबा आणि आजीच्या काळात मोठे कुटुंब असायचे.या कुटुंबाची खाण्याची गरज भागवण्यासाठी उडीद डाळीच्या पिठापासून डांगर तयार केले जायचे आणि ते भाकरी संगे फस्त केले जायचे. घरात कधी भाजी पाला असुदे अगर नसुदे या डांगराची कुटुंबाला निश्चितच खाण्याची गरज भासायची आणि मनही आकर्षित व्हायचे, घरातील आहारात याचा सर्रास वापर व्हायचा पण जस- जसा जमाना बदलला, ढाबा संस्कृती उदयाला आली व पुर्वज मंडळींची पिढी लोप पावत गेली तसतसा माणसाला डांगराचा विसर पडत गेला. आणि जिभेचे चोचले पुरवण्यासाठी आधुनिक पदार्थ याकडे मन वळले गेले. आणि आहारातून हे डांगर नाहीसे आणि लोप पावत गेले.