भावाच्या निधनाच्या धक्क्याने बहिणीचाही मृत्यू; एकाच वेळी बहीण-भावाच्या निधनाने उपस्थित शोकाकुल

कोगनोळी :
येथील प्रभाग क्रमांक आठ मधील ज्येष्ठ नागरिक श्रीपती इनाप्पा आवटे (वय 75) यांचे निधन झाले. त्यानंतर काही वेळातच या दुःखद घटनेचा धसका घेतलेल्या श्रीपती आवटे यांच्या भगिनी इंदुमती पुंडलिक माने (वय 60 रा. माणगाव जि. कोल्हापुर) यांचा हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने मृत्यू झाला. भाऊ बहिणीच्या एकाच वेळी झालेल्या या एक्झिटने बहीण-भावाच्या प्रेमळ नात्याच्या चर्चेसह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
श्रीपती आवटे हे मागील वर्षापासून अर्धांगवायूने आजारी होते. सोमवारी त्यांची प्रकृती अधिकच खालावल्याने घरी नातेवाईकांचा ओघ सुरू झाला. त्यातच त्यांच्या भगिनी इंदुमती याही होत्या. या नातेवाईकांच्या भेटी दरम्यानच श्रीपती यांची प्राणज्योत मालवली. भावाचा मृत्यु डोळ्यादेखत पाहिलेल्या इंदुमती यांना मानसिक धक्काच बसला. त्यामुळे त्यांना आलेल्या हृदयविकाराच्या तीव्र धक्क्यामुळे उपचारार्थ नेत असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. श्रीपती यांच्या पश्चात भाऊ, बहीण, मुले, सुना, नातवंडे तर इंदुमती यांच्या पश्चात मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. भाऊ व बहिण दोघांचीही एकाच वेळी झालेल्या या एक्झिटने कोगनोळी सह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.