ताज्या बातम्यामहाराष्ट्र

बिपरजॉय चक्रीवादळ गुजरातला धडकल्यानंतर आता राजस्थानच्या दिशेने ; अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा

बिपरजॉय चक्रीवादळ  गुजरातला  धडकल्यानंतर आता राजस्थानच्या  दिशेने पुढे सरकत आहे. गुजरातसह राजस्थानमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस सुरु आहे. गुजरातमध्ये बिपरजॉय धडकल्यानंतर मोठं नुकसान झालं आहे. गुजरातमधील विध्वंसानंतर चक्रीवादळ राजस्थानकडे पुढे सरकत आहे. या भागातही चक्रीवादळाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. गुजरातमध्ये अधूनमधून पाऊस सुरु आहे. बिपरजॉय चक्रीवादळ 15 जून रोजी रात्री भारताच्या किनारपट्टीवर धडकलं. यामुळे काही लोक जखमी झाले असून घरांसह इतर नुकसान झालं आहे. विजेचे खांब पडून वीजपुरवठा खंडीत झाला आहे.

बिपरजॉय चक्रीवादळ गुरुवारी रात्री 11.30 च्या सुमारास गुजरातच्या कच्छ जिल्ह्यातील जाखाऊ किनारपट्टीवर धडकलं. किनारपट्टीला धडकल्यानंतर चक्रीवादळाचा वेग सातत्याने कमी होत आहे. पण, धोका मात्र टळलेला नाही. जखाऊ आणि मांडवीसह कच्छ आणि सौराष्ट्रातील बहुतांश भागात मुसळधार पाऊस सुरु आहे. आता बिपरजॉय चक्रीवादळ राजस्थानच्या दिशेने पुढे सरकत आहे. येथील वाऱ्याचा वेग ताशी 75 ते 85 किलोमीटर इतका आहे. 

बिपरजॉय चक्रीवादळ राजस्थानच्या दिशेने

बिपरजॉय चक्रीवादळामुळे आज आणि उद्या गुजरात आणि राजस्थानमध्ये मुसळधार पाऊस पडणार असल्याचं हवामान खात्यानं सांगितलं आहे. गुजरातशिवाय आणखी चार राज्यांमध्ये या चक्रीवादळाचा परिणाम दिसून येणार आहे. पुढील चार दिवस राजस्थान, पंजाब, हरियाणा, नवी दिल्ली आणि उत्तर प्रदेशमध्ये मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

हजारो लोकांचं सुरक्षित स्थळी स्थलांतर

गुजरातमधील किनारपट्टी भागातील हजारो नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, बिपरजॉय चक्रीवादळामुळे गुजरात तसेच शेजारील महाराष्ट्र आणि हरियाणामध्ये मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks