1 लाखाची लाच घेताना ग्रामसेवक अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

जलजीवन मिशन अंतर्गत केलेले काम हस्तांतर करुन घेवुन कामाचा पुर्णत्वाचा दाखला देण्यासाठी व नळ जोडणीचे कामाचे कार्यारंभ आदेश देण्यासाठी 1 लाख 5 हजार रुपयांची लाच स्वीकारताना हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ तालुक्यातील पुर ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून अटक केली. एसीबीच्या पथकाने ही कारवाई गुरुवारी (दि.26) केली.
सुर्यकांत शंकरराव खाडे (वय-50 सध्या रा. वैष्णवी नगर,खटकाळी बायपास हिंगोली मूळ गाव नागलगाव, ता.कंधार जि.नांदेड) असे लाच घेताना पकडलेल्या ग्रामसेवकाचे नाव आहे. याबाबत औंढा नागनाथ तालुक्यातील पुर येथील 39 वर्षाच्या ठेकेदाराने हिंगोली एसीबी कार्यालयात तक्रार दिली आहे.
तक्रारदार यांनी जलजीवन मिशन अंतर्गत पुर ग्रामपंचायतीमध्ये काम केले आहे. या कामाचे हस्तांतर करुन घेऊन पुर्णत्वाचा दाखला देऊन नळ जोडणीच्या कामाचे कार्यारंभ आदेश देण्यासाठी ग्रामसेवक खाडे याने 1 लाख 15 हजार रुपयांची लाच मागितली. तडजोडी अंती 1 लाख 5 हजार रुपये देण्याचे ठरले. तक्रारदार यांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी हिंगोली एसीबीकडे तक्रार केली.
एसीबीच्या पथकाने पंचासमक्ष पडताळणी केली असता पुर्णत्वाचा दाखला देण्यासाठी आणि नळ जोडणी कामचे कार्यारंभ आदेश देण्यासाठी ग्रामसेवक सूर्यकांत खाडे याने तक्रारदार यांच्याकडे 1 लाख 15 हजार रुपयांची लाच मागून तडजोडी अंती 1 लाख 5 हजार रुपये स्वीकारण्याचे मान्य केले. त्यानुसार पथकाने सापळा रचला. तक्रारदार यांच्याकडून लाचेची रक्कम स्वीकारताना खाडे याला रंगेहाथ पकडण्यात आले. सुर्यकांत खाडे याच्यावर कुरुंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हिंगोली एसीबीचे पोलीस निरीक्षक प्रफुल्ल अंकुशकर करीत आहेत.
ही कारवाई एसीबी नांदेड परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक डॉ. राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप अधीक्षक अनिल कटके, पोलीस निरीक्षक प्रफुल्ल अंकुशकर, सहायक पोलीस उप निरीक्षक युनूस शेख, विजय शुक्ला पोलीस अंमलदार रवींद्र वरणे, ज्ञानेश्वर पंचलिंगे, गजानन पवार, गोविंद शिंदे, भगवान मंडलिक,अकबर,योगिता अवचार, राजाराम फुपाटे, शिवाजी वाघ यांच्या पथकाने केली.