राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया प्रकृती पूर्णपणे स्थिर ,२-३ दिवसांत डिस्चार्जची शक्यता

मुंबई ऑनलाईन
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर मंगळवारी रात्री मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात शस्त्रक्रिया पार पडली. एन्डोस्कोपीद्वारे शरद पवार यांच्या गॉल ब्लॅडरमधील मोठा स्टोन बाहेर काढण्यात आला. त्यामुळे आता शरद पवार यांना पोटदुखीचा त्रास होणार नाही.
मात्र, शरद पवार यांच्या गॉल ब्लॅडरवरही आणखी एक शस्त्रक्रिया करण्याची गरज आहे. ही शस्त्रक्रिया नक्की कधी करायची, याचा निर्णय अद्याप डॉक्टरांनी घेतलेला नाही. मात्र, आता शरद पवार यांची प्रकृती पूर्णपणे स्थिर आणि चांगली आहे.
या शस्त्रक्रियेसंदर्भातील ब्रीच कँडीमधील डॉक्टर अमित मायदेव यांनीही एएनआयशी बोलताना सविस्तर माहिती दिली. “काही चाचण्या केल्यानंतर आम्ही त्यांच्यावर आजच (मंगळवारी) रात्री शस्त्रक्रिया करण्याचं ठरवलं. काही कॉम्पलिकेशन्स निर्माण झाल्याने आम्ही लगेच शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. त्यांचे पित्तशय काढायचे की नाही याचा निर्णय आम्ही नंतर घेणार आहोत. सध्या ते देखरेखीखाली आहेत,” असं डॉक्टर मायदेव यांनी सांगितलं आहे.