ताज्या बातम्यामहाराष्ट्र

आठवडाभर घरातच थांबा आणि कोरोनाला रोखा : ग्रामविकास मंत्री मुश्रीफ यांचे आवाहन; केंद्राने लस पुरवठा सुरळीत करण्याची केली आग्रही मागणी

           
कागल :

कोल्हापूर जिल्ह्यात शनिवारपासून आठवडाभर कडक लॉकडाऊन सुरू होत आहे. या लॉकडाऊनमध्ये घरातच रहा,  कुणीही बाहेर पडू नका आणि कोरोनाचा संसर्ग रोखा, असे आवाहन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. लॉकडाऊनमध्ये नियमबाह्य फिरणाऱ्या कुणाचीही गय करू नका, अशा सक्त सूचनाही त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांना दिल्या. मृत्यूदर कमी करण्यासाठी केंद्र सरकारने लसीचा पुरवठा सुरळीत करावा, अशी आग्रही मागणीही त्यांनी केली.
      
कागलमध्ये डी. आर. माने महाविद्यालयाच्या प्रांगणात कोरोनाच्या आढावा बैठकीत मंत्री श्री. मुश्रीफ बोलत होते.
      
यावेळी बोलताना मंत्री श्री. मुश्रीफ पुढे म्हणाले, कागल तालुक्यात एकूण पाचशे बेडची व्यवस्था असेल. कागल शहरात ४५० पैकी १२० बेड ऑक्सिजनचे असतील व  मुरगूड शहरातील ५० पैकी ३० बेड ऑक्सिजनचे असतील. कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेला जादाचा ऑक्सिजन पुरवठा व चौपट ते पाचपट वाढीव रेमडीसिवेहीर इंजेक्शनमुळे जनतेला दिलासा मिळाला आहे. कोरोनाची तिसरी लाट येणारच नाही, यासाठी सर्वांनी दक्षता घेऊया. आलीच तर ऑक्सिजनसह लहान मुलांसाठीही सज्जता ठेवावी लागेल. सध्या भारतात असलेला बी – १६१७ हा विषाणू खतरनाक असून दोन ते तीन दिवसातच या विषाणूच्या संसर्गचा वेग प्रचंड वाढतो, असे ते म्हणाले. मागणी आणि गरजेच्या तुलनेत लसीची उपलब्धता कमी असल्याचे सांगताना श्री. मुश्रीफ म्हणाले,  पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यावर आता बोललेच पाहिजे.

उत्तर प्रदेश आणि बिहारच्या तुलनेत महाराष्ट्रात टेस्टिंग जादा व वैद्यकीय सुविधा चांगल्या आहेत. त्यामुळेच कोरोना नियंत्रणाबाबत असल्याकडे लक्ष वेधत श्री. मुश्रीफ म्हणाले,  महाराष्ट्राच्या या कामगिरीचे दस्तुरखुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी, नीती आयोग आणि केंद्राच्या आरोग्यमंत्र्यांनीही कौतुक केलेले आहे. कारण आम्ही आकडे लपवत नाही आणि बनवाबनवीही करीत नाही.

बैठकीला प्रांताधिकारी प्रसेन्नजित प्रधान, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सौ. मनीषा देसाई, तहसीलदार श्रीमती शिल्पा ठोकडे, गटविकास अधिकारी सुशील संसारे, कागल ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनिता पाटील, कागलचे मुख्याधिकारी पंडित पाटील, कागल कोविड केअर सेंटरचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अभिजित शिंदे, पीडब्ल्यूडीचे  उपअभियंता डी व्ही शिंदे, कागलचे पोलिस निरीक्षक दत्तात्रय नाळे, मुरगूडचे पोलीस उपनिरीक्षक विकास बडवे, सहाय्यक गटविकास अधिकारी आप्पासाहेब माळी, कागलचे नगर अभियंता सुनील माळी, मुरगूड ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. पल्लवी तारळकर यांच्यासह केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्या माने, माजी उपनगराध्यक्ष प्रकाश गाडेकर, रमेश माळी, चंद्रकांत गवळी, प्रवीण काळबर आदी प्रमुख उपस्थित होते.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks