मराठा आरक्षण व मराठा समाजाच्या मागण्या मान्य व्हाव्या यासाठी गडहिंग्लज येथे तहसीलदार यांना निवेदन

गडहिंग्लज प्रतिनिधी:(सोहेल मकानदार)
मराठा आरक्षण संबंधित व मराठा समाजाच्या इतर मागणी मान्य व्हाव्या याकरिता गडहिंग्लज येतील सकल मराठा समाजाच्या वतीने तहसीलदार यांना याबाबतचे निवेदन देण्यात आले.
सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्दबातल ठरवले आहे . या न्यायालयाने दिलेल्या निकालामुळे महाराष्ट्रातील संपूर्ण मराठा समाजामध्ये प्रचंड खदखद व असंतोष पसरलेला आहे . गेली अनेक वर्षे सनदशीर व लोकशाही मार्गाने आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी मराठा लढत आहे . अगदी लाखोंचे मुकमोर्चे काढून मराठा समाजाने राज्याला नाही तर संपूर्ण देशाला एक आदर्श घालून दिला व आरक्षण मिळविले . पण सर्वोच्च न्यायालयाने हे आरक्षण रद्द केले . यामुळे मराठा समाजाचे खच्चीकरण होऊन मराठा युवक उद्रेक करण्याच्या मनस्थितीत पोहचला आहे . पण सध्या देशावर आलेल्या कोरोना सारख्या महाभयंकर संकटाच्या परिस्थितीचा विचार करता , सकल मराठा समाजाने सर्वाना सयंम राखण्याचे आवाहन केले आहे . मराठा समाजाच्या असंतोषाला बांध घालणे अत्यंत कठीण होत असून मागण्यांचा पाठपुरावा करून त्यावर लवकर सकारात्मक निर्णय घ्यावा.
मराठा समाजाला घटनात्मक आरक्षण देणे . राज्य शासनाने सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची चिकित्सा जेष्ठ विधितज्ञाच्या मार्फत करून घ्यावी व तातडीने मराठा आरक्षणाचा ठराव विधिमंडळात करून केंद्र सरकारला मराठा आरक्षण देण्याच्या दृष्टीने हा ठराव संसदेत मंजूर करून घेण्यास भाग पाडावे व राष्ट्रपतींच्या सहीने मराठा समाजाला घटनात्मक आरक्षण मिळण्यासाठी कार्यवाही व्हावी
आरक्षण रद्द झाल्याने मराठा समाजातील तरुणांचे आयुष्य अंधःकारमय होणार असून त्यांच्या मनात नैराश्याची भावना निर्माण होत आहे त्यामुळे पुन्हा एकदा आत्महत्येसारखे अविचार येऊ नयेत यासाठी पुन्हा आरक्षण मिळेपर्यंत मराठा समाजाला दिलास मिळणेसाठी राजर्षी शाहू महाराज शिक्षण , प्रशिक्षण , मानव विकास संस्था , ( सारथी ) व कै.अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला भरीव तरतूद करून संस्था सक्षम कराव्यात
मराठ्यांच्या प्रमुख मागण्या :
मराठा समाजाला घटनात्मक रित्या टिकणारे आरक्षण राज्य शासनाने त्वरित द्यावे यासाठी राज्य शासनाने केंद्र शासनाकडे तशी मागणी करावी . केंद्राने तसा ठराव पास घटना दुरुस्ती करावी*
राजर्षी शाहू महाराज संशोधन शिक्षण , प्रशिक्षण व मानव विकास संस्था सारथी ही संस्था मराठा समाजाच्या प्रगतीचा पाया ठरणारी आहे यासाठी या संस्थेचा विस्तार करावा
ह्या सारथी संस्थेची उपकेंद्रे महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात तातडीने स्थापन करावी
सारथी संस्थेच्या संचालक मंडळाने मराठा समाजामधील विविध क्षेत्रातील तज्ञ व्यक्तींचा समावेश करावा
सारथी संस्थेसाठी प्रतिवर्षी २००० कोटींचा निधी द्यावा
सारथी संस्थेवर कार्यक्षम अधिकाऱ्यांची नियुक्ती त्वरित करावी
कै . अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मागास महामंडळाची भूमिका व्यापक करावी व्यवसाय सोबत शैक्षणिक कर्जाचा समावेश महामंडळामध्ये करावा
या महामंडळामार्फत देण्यात येणाऱ्या कर्ज वितरणामध्ये सुलभता आणावी
महामंडळामार्फत देण्यात येणाऱ्या कर्जाची मर्यादा वाढवावी
मंडळासाठी प्रतिवर्षी ५००० कोटी रुपयांची तरतूद करावी
मराठा समाजाच्या शैक्षणिक उन्नतीसाठी राज्य सरकारने मराठा समाजातील सर्व विद्यार्थ्यांची शैक्षणिक शुल्क रचना ओबीसी समाजाच्या विद्यार्थ्यांप्रमाणे करावी
सरकारी नोकरीमध्ये सन २०१४ पासून मराठा आरक्षणा मधून ज्यांची निवड झाली आहे त्यांना ताबडतोब नोकरीवर रुजू करून घ्यावे
नोकरी व शिक्षणामध्ये ज्या सुविधा ओबीसी प्रवर्गासाठी मिळतात त्याच प्रमाणे मराठा समाजाला मिळण्याची तरतूद करावी
देशावर आलेल्या कोरोनासारख्या भयंकर संकटांवर योग्य उपाय योजना करून मात करावी . पक्षीय राजकारण थांबवावे
बाजार मूल्यावर आधारित हमीभाव लागू करून शेतकरी वर्गाला न्याय द्यावा
छत्रपती शिवाजी महाराजांची जगदंबा तलवार राज्य शासनाने भारतात परत आणावी
छत्रपती शिवाजी महाराजांची जीवंत स्मारक म्हणजे गडकिल्ले जतन व संवर्धनासाठी विशेषा प्रयत्न झाले पाहिजेत
उपरोक्त ज्या मागण्या राज्य सरकारच्या अखत्यारित आहेत . त्या गोष्टींची पूर्तता राज्यशासनाने ताबडतोब करावी , तसेच केंद्र सरकार मार्फत पूर्ण होणाऱ्या मागण्यासंदर्भात महाराष्ट्रातील सर्वपक्षीयांचे एकमत करून मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागण्यासंबंधी सर्वोतोपरी प्रयत्न करावे.तसेच सर्व मंत्रीमहोदय , खासदार , आमदार यांनी आपली लेखी भूमिका स्पष्ट करून सर्वपक्षीय एकवाक्यता करावी . अन्यथा मराठा समाजाचा जो उद्रेक होईल त्याला सर्वस्वी राज्यशासन आणि लोकप्रतिनिधी जबाबदार राहतील.
निवेदनावर सकल मराठा समाजाचे, सुधीर उर्फ आप्पासो शिवणे, किरण अण्णा कदम, वसंत यमगेकर, युवराज बरगे, सागर मांजरे, नागेश चौगुले, विश्वास खोत,संजय पाटील,किरण डोमणे यांच्या सह्या आहेत.