कुडाळ मध्ये शिवसेनेच्या पेट्रोल आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद; प्रत्येक वाहनाला 100 रुपयात 2 लिटर पेट्रोलचे झाले वाटप

कुडाळ :
शिवसेनेच्या ५५ व्या वर्धापन दिनानिमित्त आज कुडाळ येथे शिवसेना आमदार वैभव नाईक यांच्या वतीने प्रत्येक वाहनाला १०० रुपयात २ लिटर पेट्रोल देण्यात आले. याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. अनेकांनी पेट्रोल पंपावर रांगा लावत या उपक्रमाचा लाभ घेतला. पेट्रोल दरवाढीच्या निषेधार्थ शिवसेनेच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले.
गेले अनेक महिने पेट्रोल डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. कोरोना महामारीचा फटका नागरिकांना बसला आहे त्यातच पेट्रोल डिझेलचे दर वाढत असल्याने नागरिक मेटाकुटीस आले आहेत. मात्र केंद्रातील भाजप सरकारकडून पेट्रोल डिझेलचे दर कमी केले जात नाहीत.याउलट पेट्रोल डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. याच्या निषेधार्थ शिवसेनेच्या वतीने आ. वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली कुडाळ येथे नागरिकांना पेट्रोल मोफत देऊन हे अनोखे आंदोलन छेडण्यात आले. याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
शिवसेना जिंदाबाद, बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. यावेळी आ.वैभव नाईक यांनी शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या.