खास. नारायण राणे यांनी घेतली केंद्रीय मंत्रीपदाची शपथ

मुंबई :
“मै नारायण तातू राणे ईश्वर की शपथ लेता हू की…” अशा शब्दांत आज कोकणचा ढाण्या वाघ खास. नारायण राणे यांनीकेंद्रीय मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. त्यामुळे आता खास. नारायण राणे केंद्रीय मंत्री म्हणून कार्यभार सांभाळायला सिद्ध झाले आहेत.
मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्ममधील पहिला मंत्रीमंडळ विस्तार आज सायंकाळी ६ वाजता संपन्न झाला. यावेळी कोकणचा कणखर आवाज खास. नारायण राणे यांनी आपल्या मंत्रीपदाची शपथ घेतली. त्यामुळे कोकणातील भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये तसेच राज्यभरातील राणेसमर्थकांमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे. राणे कुटुंबियांच्या चेहऱ्यावरचा आनंदही ओसंडून वाहत आहे.
नव्या मंत्रीमंडळ विस्तारात आज ४३ खासदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. या यादीत पंतप्रधान मोदी यांनी सन्मानाने खास. नारायण राणेंचं नाव पहिल्या क्रमांकावर घेतलं आहे. त्यामुळे नारायण राणेंच्या पदरी मोठी जबाबदारी मोदी सरकार टाकणार, याची सर्वांना खात्री झाली आहे. नगरसेवक, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते, आमदार , खासदारअशा अनेक जबाबदाऱ्या नारायण राणे यांनी यशस्वीपणे पार पाडलेल्या आहेत. अनेक खात्यांचा कारभार यशस्वीपणे केला आहे. आता केंद्रीय मंत्रीपदी निवड करून त्यांच्या कामाचं योग्य ते फळ पंतप्रधान मोदी आणि भाजपाने दिलं आहे, अशी कार्यकर्त्यांनी भावना व्यक्त केली आहे. महाराष्ट्रातून चार नव्या चेहऱ्यांना केंद्रीय मंत्रीमंडळात संधी मिळाली आहे. त्यात नारायण राणे, कपिल पाटील, भागवत कराड, भारती पवार यांचा समावेश आहे.
दोन दिवसांपूर्वी भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा खास. नारायण राणेंना फोन आल्यापासून नारायण राणेंना कोणतं खातं मिळतंय, या चर्चेला राज्यात उधाण आलं होतं. त्यानंतर काल राणे सपत्नीक दिल्लीला रवाना झाले होते. कोकणात भाजपाच्या संघटनेला बळ मिळावं, यासाठी नारायण राणेंसारखं खंबीर नेतृत्व भाजपकडे असणं महत्त्वाचं होतं. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यामुळेही नारायण राणे यांचं नाव चर्चेत आलं होतं. तसेच आगामी काळात होणाऱ्या मुंबई महानगरपालिका निवडणूकीमध्येही नारायण राणे यांच्या ताकदीचा उपयोग भाजपाला करता येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सहकार क्षेत्रात विधायक काम करण्याचा मानस असून या खात्याचा कार्यभार खास. नारायण राणे यांच्याकडे देण्याची शक्यता राजकीय सूत्रांमार्फत वर्तवण्यात येत आहे.