गर्दी झाली तर अत्यावश्यक सेवा देखील बंद करा, मुख्यमंत्र्यांचे स्थानिक प्रशासनाला आदेश

मुंबई :
महाराष्ट्रात वाढती कोरोना रुग्णसंख्या हा चिंतेचा विषय बनला आहे. कोरोना रुग्णसंख्या वाढीमुळे महाराष्ट्रात राज्य सरकारतर्फे कडक संचारबंदीचे आदेश देण्यात आले आहेत. परंतु या संचारबंदीमध्ये अत्यावश्यक सेवेतील आस्थापनांना सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे.
अत्यावश्यक सेवांना सुरू ठेवल्यामुळे महाराष्ट्रातील काही भागांमध्ये नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. त्याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्थानिक प्रशासनाला होणारी गर्दी रोखण्यासाठी महत्त्वाचे आदेश दिले आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्थानिक प्रशासनाला जर नागरिक गरजेपेक्षा जास्त गर्दी करत असतील तर परिसरातील अत्यावश्यक सेवाही बंद करण्यात याव्यात, असे आदेश दिले आहेत. त्यामुळे आता स्थानिक प्रशासन गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अत्यावश्यक सेवांवर बंधने आणू शकते.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज बैठक घेऊन संचारबंदीचे नियम मोडणार्या नागरिकांवर कडक कारवाई करावी, असेही आदेश प्रशासनाला दिले आहेत. त्याबरोबरच बऱ्याच ठिकाणी अत्यावश्यक सेवेचे काम सांगून नागरिक गर्दी करत आहेत, त्यामुळे संचारबंदीचे उल्लंघन होत असल्याने स्थानिक प्रशासनाने याबाबत योग्य तो निर्णय घेण्याचेही आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले.