महासंस्कृती महोत्सवात पोवाड्यामधून शिवरायांनी केलेल्या गौरवशाली कार्याला उजाळा ; शाहीर रंगराव पाटील यांचे दमदार सादरीकरण

प्रतिनिधी : रोहन भिऊंगडे
शाहीर रंगराव पाटील यांनी शाहू मिल येथे सादर केलेल्या पोवाड्यामधून छत्रपती शिवाजी महाराजांच्या गौरवशाली कार्याला उजाळा दिला. त्यांनी व त्यांच्या सहकारी कलाकारांनी यावेळी पोवाड्याबरोबर काही प्रसंग सादर करुन शिवरायांच्या कार्याची महती विशद केली. शाहीर रंगराव पाटील आणि सहकारी हे कोल्हापूर तसेच महाराष्ट्रामध्ये स्फूर्तीदायी पोवाड्यांच्या माध्यमातून सुप्रसिद्ध आहेतच पण त्यांचे कार्यक्रम महाराष्ट्राबाहेरील ठिकाणी देखील झालेत. एका ऐतिहासिक वाटचालीवर त्याच घटनेचा जाज्व्ल्य आणि जिवंत इतिहास शाहिरांकडून ऐकण्यास मिळावा असे भाग्य सर्वांनाच हवे असते. आणि हाच उद्देश समोर ठेवून सांस्कृतिक कार्य विभाग आणि कोल्हापूर जिल्हा प्रशासन यांच्या समन्वयातून महासंस्कृती महोत्सव २०२४ चे कोल्हापुरात ३१ जानेवारी पासून ५ दिवस ऐतिहासिक शाहू मिल येथे आयोजन करण्यात आले आहे. या महासंस्कृती महोत्सवाची सांगता रविवारी सायंकाळी होणार आहे.
दुसऱ्या सत्रात गुढी महाराष्ट्राची मधून नृत्याचा सांस्कृतिक जागर…
महाराष्ट्रीय सण नृत्य आणि संगीताद्वारे सादर करून दुसऱ्या सत्रात गुढी महाराष्ट्राची मधून नृत्याचा सांस्कृतिक जागर केला गेला. युवकांनी आपले पारंपरिक सण कशा पद्धतीने साजरे केले जातात हे उपस्थिताना दाखवून दिले. संगीत व नृत्याचा नेमका मेळ घालून होळी, दिवाळी, राम नवमी, दसरा, नारळी पौर्णिमा, गणेशोत्सव, नवरात्र असे १८ सण सादर केले. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते कलाकारांना सन्मानित करण्यात आले.
यात शाहीर रंगराव पाटील, बीट टू बीट कला मंच यातील कलाकारांना सांस्कृतिक महोत्सव मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. यावेळी अपर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई, उपविभागीय अधिकारी हरीश धार्मिक, जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसूळ, प्रमोद पाटील उपस्थित होते.
याचबरोबर याठिकाणी सुरु असलेल्या प्रदर्शनीय कलादालनाला आजही कोल्हापूरकरांनी चांगली दाद दिली. खाद्य संस्कृती पाहण्यासाठी व तिचा आस्वाद घेण्यासाठीही गर्दी होती.