धक्कादायक : एसटी महामंडळात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची मुसंडी, १२ दिवसांत ६०० कर्मचारी बाधित

टीम ऑनलाईन :
कोरोनाच्या काळात पहिल्या दिवसापासून कर्तव्य बजावत असलेल्या एसटी महामंडळात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने जोरदार मुसंडी मारली आहे. एसटी महामंडळात गेल्या १२ दिवसांत तब्बल ६०० कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली असून १ एप्रिलपर्यंत एसटीत ११८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. ७ तारखेपर्यंत हीच संख्या १२८ झाली होती. तर १२ एप्रिल रोजी मृत्यूंची संख्या १३८ वर पोहोचली आहे. सोमवारी एसटीतील ६८ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याने संख्येत अधीक भर पडली आहे.
एसटी महामंडळात १ एप्रिल रोजी तब्बल ८१ जणांना कोरोनाची बाधा झाली होती. त्यात नाशिकमधील १८ तर उस्मानाबादच्या १७ जणांचा समावेश होता. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासूनच एसटीत कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसागणिक वाढते आहे. एसटीमध्ये बाधित कर्मचाऱ्यांची संख्या ५ हजार ७३९ झाली आहे. त्यापैकी ४ हजार ७९४ जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर ८०७ कर्मचारी-अधिकारी विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत. १३८ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला असून आत्तापर्यंत नाशिकमधील १३ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे.
एसटीच्या मुंबई सेंट्रल येथील मध्यवर्ती कार्यालयातील २२ कोरोनाग्रस्तांपैकी ११ जणांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर ६ जणांनी आपला जीव गमावला आहे. परंतु फक्त चालक-वाहक, वाहतूक नियंत्रक, सुरक्षा रक्षक अशा कर्मचाऱ्यांचा आर्थिक मदत देण्यात आली आहे. तर ईतर कर्मचाऱ्यांचा मात्र विचार झालेला नाही. कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांच्या वारसांना अनुकंपा तत्वावर नोकरीही देण्यात येणार आहे. मात्र अद्यापही त्याची प्रक्रिया सुरू झालेली नाही. मृतांमध्ये चालक-वाहकांची संख्या मोठी असून आत्तापर्यंत केवळ ८ जणच आर्थिक मदतीकरिता पात्र ठरले आहेत.