शिरोळ तालुका संजय गांधी निराधार योजना समितीची बैठक संपन्न,७६४ पात्र लाभार्थ्यांचे अर्ज मंजूर : प्रकाश पाटील-टाकवडेकर

शिरोळ प्रतिनिधी : विनायक कदम
शिरोळ तालुका संजय गांधी निराधार योजना समितीची बैठक मंगळवारी शिरोळ तहसीलदार कार्यालयात पार पडली सभेच्या अध्यक्षस्थानी संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष प्रकाश पाटील टाकवडेकर होते.
समितीच्या सचिव तहसीलदार अपर्णा मोरे धुमाळ प्रमुख उपस्थित होत्या, या बैठकीमध्ये 31 मार्च 2021 अखेर आलेल्या अर्जांवर सविस्तर चर्चा होऊन यामधील मंजुरीसाठी आवश्यक ते निकष पूर्ण करणाऱ्या तालुक्यातील ७६४ लाभार्थ्यांचे अर्ज समितीने मंजूर केले असल्याची माहिती अध्यक्ष प्रकाश पाटील टाकवडेकर यांनी दिली आहे, यामध्ये संजय गांधी निराधार योजने अंतर्गत येणाऱ्या अपंग व विधवा महिलांसाठी च्या दाखल अर्जापैकी २५१, इंदिरा गांधी निराधार योजनेअंतर्गत १४० तर श्रावणबाळ योजने अंतर्गत ३७३ लाभार्थ्यांना याचा लाभ मिळणार आहे, या साठी एकूण १४६४ अर्ज प्राप्त झाले होते.
कोरोना च्या पार्श्वभूमीवर राज्या समोर आर्थिक संकट असताना सुद्धा महाविकास आघाडी सरकार निराधार विधवा, दिव्यांग व वृद्धांना रक्कम वेळेत मिळावी यासाठी सुरुवातीपासून सातत्याने काम करीत आहे.
सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या प्रयत्नातून आणि सहकार्याने तालुक्यातील सर्व लाभार्थ्यांना रक्कम वेळेत मिळावी यासाठी सातत्याने सहकार्य होत असल्याचेही टाकवडेकर यांनी सांगितले.
बैठकीस संजय गांधी निराधार योजना समितीचे सदस्य धन्यकुमार सिदनाळे, विजितसिंह शिंदे, अण्णासाहेब बिलोरे, रमेशबापु शिंदे, पैलवान केशव राऊत, अफसर पटेल, महादेव कोळी यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.