ताज्या बातम्यामहाराष्ट्र

सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये आढळलेल्या दुर्मिळ वनस्पतीला शरद पवारांचं नाव

कोल्हापुर : रोहन भिऊंगडे

मागील ५० वर्षांहून अधिक काळ राजकारणात असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना आजवर अनेक मानसन्मान लाभले आहेत. राजकारण, समाजकारण व कृषी क्षेत्रातील योगदानासाठी त्यांना अनेकदा गौरवण्यात आलं आहे. या यादीत आता एका अनोख्या सन्मानाची भर पडली आहे. शरद पवारांचं नाव चक्क एका वनस्पतीला देण्यात आलं आहे.

कोल्हापूरमधील दोन तरुण संशोधक डॉ. विनोद शिंपले व डॉ. प्रमोद लावंड यांनी या वनस्पतीचा शोध लावला आहे. सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये प्रथमच आढळलेली ही वनस्पती आहे. अशा प्रकारच्या वनस्पती फक्त आशियातच आढळतात. या वनस्पतीला जुलै ते सप्टेंबर दरम्यान फुले येतात आणि डिसेंबरपर्यंत ही वनस्पती फळे देते. ही वनस्पती आता ‘अर्जेरिया शरदचंद्रजी’ या नावानं ओळखली जाणार आहे.
ही वनस्पती गारवेल कुळातील आहे. डॉ. शिंपले हे गेल्या २० वर्षांपासून या कुळातील वनस्पतींचा अभ्यास करत आहेत. त्यांनी आतापर्यंत गारवेल कुळातील पाच नव्या प्रजातींचा शोध लावला आहे. जगभरात त्यांच्या सशोधनाला मान्यता मिळाली आहे. ‘अजेंरिया शरदचंद्रजी’ या वनस्पतीचे संशोधन कालिकत विद्यापीठाच्या ‘रिडीया’ या आंतरराष्ट्रीय विज्ञान ग्रंथातून अलीकडंच प्रकाशित करण्यात आलं आहे.
कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल आम्ही या वनस्पतीला पवारसाहेबांचं नाव घेण्याचा निर्णय घेतला, असं डॉ. शिंपले यांनी पीटीआयशी बोलताना सांगितलं. काही वर्षांपूर्वी आपलं संशोधन पुस्तक स्वरूपात प्रसिद्ध करण्यासाठी पवार साहेबांनी मदत केली होती, हेही त्यांनी नमूद केलं.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks