शरद पवार- अमित शहा भेट : ‘सर्व काही सांगायचे नसते’ म्हणत वाढवला सस्पेन्स

मुंबई ऑनलाईन :
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची गुजरातमध्ये भेट घेतल्यानंतर आता दुसरा अंक सुरू झाला आहे. या गुप्त भेटीनंतर अमित शहा दिल्लीत दाखल झाले असून पत्रकारांनी या भेटीबद्दल विचारले असता ‘सर्व काही सांगायचे नसते’ असे सांगत सस्पेन्स वाढवला आहे. गुप्त भेट आणि शहा यांच्या या वक्तव्यानंतर महाविकास आघाडी सरकारच्या भवितव्याबाबत चर्चेला ऊत आला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, नेते प्रफुल्ल पटेल यांनी गृहमंत्री अमित शहा यांची अहमदाबादमध्ये एका फार्म हाऊसमध्ये भेट घेतली. यावेळी काही उद्योगपतीही उपस्थित होते. परंतु शहा यांच्याशी गुप्त भेट झाल्याचे बोलले जात आहे.
अमित शहा आज दिल्लीत दाखल झाले असून त्यांना पत्रकारांनी शरद पवार यांच्या भेटीबाबत विचारले असता, ‘सर्वकाही जाहीर करण्यासारखे नसते, असे सूचक वक्तव्य त्यांनी केले. शहा यांचे वक्तव्य शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल यांची भेट झाल्याचेच स्पष्ट करते. शहा आणि पवार यांच्या भेटीबाबत एका गुजराती वृत्तपत्रात बातमी येताच महाराष्ट्राच्या राजकीय पटलात उत्सुकता लागली होती. या बातमीचा राष्ट्रवादीचे प्रवक्ते नबाब मलिक यांनी इन्कार केला होता. मात्र, शहा यांच्या वक्तव्यानंतर महाविकास आघाडीचे भवितव्य काय असेल याबाबतही तर्कवितर्क लढविले जात आहेत .