ग्रंथ दान चळवळ ही लोक चळवळ व्हावी – प्राचार्य जीवनराव साळोखे ; गगनबावड्यात जाहीर ग्रंथदान समारंभाचे आयोजन

निकाल न्यूज प्रतिनिधी : विजय मोरबाळे
पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव महाविद्यालय, गगनबावडा येथे ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ या महाराष्ट्र शासन आणि शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांनी निर्देशित केलेल्या कृतीकार्यक्रमांतर्गत दि. १६ जानेवारी रोजी “जाहीर ग्रंथदान समारंभ” आयोजित करून या संकल्पाचा समारोप कार्यक्रम संपन्न झाला.
ग्रंथदाते प्राचार्य जीवनराव साळोखे यांच्या सातत्यपूर्ण उपक्रमातून या कार्यक्रमात गगनबावडा तालुक्यातील माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, वरिष्ठ महाविद्यालये आणि ग्राम वाचनालये यांना नियोजनपूर्वक ग्रंथसंच प्रदान करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते स्वराज्यरक्षक छ. संभाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त त्यांच्या प्रतिमापूजन आणि दिपप्रज्वलनाने करण्यात आले.
प्रमुख संयोजक प्रा. ए. एस. कांबळे यांनी स्वागत आणि प्रास्ताविकात संपूर्ण कार्यक्रमाचा उद्देश, गेल्या पंधरवड्यात महाविद्यालयात संपन्न झालेल्या ग्रंथ प्रदर्शन, दुर्मिळ ग्रंथ प्रदर्शन, फिरते ग्रंथालय, परिसंवाद, मुक्त काव्य वाचन, कथाकथन, वाचन कौशल्य विकास कार्यशाळा इत्यादी कार्यक्रमांचा आढावा घेतला.
उद्घाटन सत्रास प्रमुख उपस्थिती लाभलेल्या आनंदी शिक्षण प्रसारक मंडळाच्या सचिव डॉ. विद्या देसाई यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या, “आपली सर्वांची वैयक्तिक, सामाजिक, भौतिक आणि आर्थिक उन्नती ही केवळ आणि केवळ ग्रंथांमुळे आणि वाचनाने झाली आहे हे आपण सतत ध्यानीमनी ठेऊन आपल्या पाल्यांच्या उच्च शिक्षणासाठी झटले पाहिजे”.
गट शिक्षणाधिकारी मा. आर. आर. कुंभार यांनी आपल्या मनोगतात “मानवी संस्कृती ही वाचनाने प्रगल्भ झालेली आहे, त्यामुळे वाचनावर आणि ग्रंथांवर आपले प्रेम जडले पाहिजे” असे मत व्यक्त केले. श्री. संत ज्ञानेश्वर विद्यालय शेणवडे-मणदूर चे मुख्याध्यापक मा. आर. पी. चौगुले यांनी बोलतांना “पुस्तके आपली मस्तके घडवतात त्यामुळे सण समारंभात बुके ऐवजी बुक देऊन वाचन संस्कृती वृद्धिंगत करावी” असे प्रतिपादन केले.
साळवण येथील सामाजिक कार्यकर्ते मा. संभाजी भालेकर यांनी “गावोगावी ग्रंथालये निर्माण होऊन ती नियमित चालली पाहिजेत त्यासाठी संघटीत प्रयत्न करूया” असे आवाहन केले. बावेली येथील युवा कथाकथनकार मा. राहूल कांबळे म्हणाले की “वाचन आपला स्वभाव बनला पाहिजे, मोबाइलला विश्रांती देऊन पुस्तकांशी मैत्री करणे हे तरुणांसाठी आजच्या काळात आवश्यक बनले आहे”.
प्रमुख मार्गदर्शनात ग्रंथदाते आणि ज्येष्ठ साहित्यिक प्राचार्य जीवनराव साळोखे यांनी मार्गदर्शन केले, ते म्हणाले की “ग्रंथ आणि वाचन चळवळ कोणा एकट्याची नाही तर ती लोक चळवळ बनायला हवी, चांगली पुस्तकेच आपल्याला अभयदान देऊ शकतात त्यामुळे आधुनिक काळात चालू असलेली ग्रंथांची उपेक्षा तात्काळ थांबवून आपण सर्वांनी ग्रंथांकडे जायला हवे”.
अध्यक्षीय समारोपात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. टी. एम. पाटील यांनी बोलताना “गगनबावडा तालुक्यातील शैक्षणिक परिस्थितीचा आढावा घेत ‘वाचन संकल्प’ कशासाठी करायचा? इथल्या मातीतून हिरे जन्मायचे असतील तर या मातीत रुजलेली शैक्षणिक चळवळ आपल्याला पुनर्जीवित करायला हवी, ह्या मातीला जागतिक पटलावर न्यायचे तर खेड्यापाड्यात राहणाऱ्या सर्वसामान्य तरुणांनी उच्च शिक्षणाची कास धरली पाहिजे आणि त्यासाठी वाचन संस्कार आवश्यक आहेत, येत्या काळात या ग्रंथ चळवळीला अधिक बळकटी देण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत, वाचन संकल्प महाराष्ट्राचा हा कार्यक्रम यशस्वीपणे राबविण्यात आपण अग्रभागी आहोत याचे समाधान आहे” असे प्रतिपादन केले. कार्यक्रमात सहभागी सर्व शाळा, महाविद्यालयाच्या प्रतिनिधींना मान्यवरांच्या हस्ते ग्रंथदान करण्यात आले.
यावेळी द. मो. पाटील कनिष्ठ महाविद्यालय तिसंगी, म. ह. शिंदे वरिष्ठ महाविद्यालय तिसंगी, शासकीय निवासी शाळा गगनबावडा, मा. उदयसिंह ऊर्फ बाळ पाटील माध्यमिक विद्यालय असळज, डॉ. डी. वाय. पाटील इन्स्टिट्यूट फॉर शुगर अँड अप्लाईड प्रॉडक्टस् टेक्नॉलॉजी वेसरफ, श्री. संत ज्ञानेश्वर माध्यमिक विद्यालय शेणवडे, मुरलीधर सार्वजनिक ग्रंथालय आणि वाचनालय गगनबावडा, माध्यमिक विद्यालय सांगशी, श्रीराम हायस्कूल बावेली, माध्यमिक विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय शेळोशी, लोकनेते उदयसिंह पाटील वाचनालय असळज, शासकीय आश्रमशाळा बोरबेट इत्यादी संस्थांचे मुख्याध्यापक, प्राचार्य आणि ग्रंथपाल उपस्थित होते.
कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष प्रा. सतिश देसाई, माजी नायब तहसिलदार मा. अनंत कवळेकर, उपप्राचार्य डॉ. एस. एस. पानारी, प्राचार्य एच. एस. फरास उपस्थित होते. संयोजनात प्रा. वंदना पाटील, प्रा. आस्मा ए. जमादार, प्रा. आर. एस. कांबळे, प्रा. एस. एस. देसाई, प्रा. ए. आर. गावकर, प्रा. आर. आर. सरनोबत, प्रा. शितल ए. मोहिते, प्रा. ए. सी. कुंभार, प्रा. पि. बी. शिंदे आणि प्रा. आर. आर. नर यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रा. ए. जी. धामोडकर मॅडम आणि प्रा. एस. एस. घाटगे मॅडम यांनी केले तर आभार प्रा. डॉ. संतोष भोसले यांनी मानले.