तुमचे चेहरे पाहून जगात कोरोना नसल्याची खात्री पटली, मीही मास्क काढून बोलतो – आ जयंत पाटील

पंढरपूर:
राज्यात कोरोना रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत चालली आहे. तसेच नागरिकांना वारंवार कोरोनाच्या नियमांचं पालन करण्याचं आवाहन केलं जात आहे. मात्र राज्याचे मंत्रीच नियमांचं पालन करत नसल्याचं दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री जयंत पाटील यांनी एका प्रचारसभेत चक्का मास्क काढून भाषण केलं आहे.
आघाडीचे उमेदवार भगीरथ भालके यांच्या प्रचारासाठी पंढरपुरात आज सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. या सभेला जयंत पाटलांनी संबोधित केलं. यावेळी त्यांनी तुमचे चेहरे बघितल्यावर जगात कोरोना नसल्याची खात्री पटली आहे. त्यामुळे मीही मास्क काढूनच बोलतो, असं जयंत पाटील म्हणाले. कोरोनामुळे राज्यात लॉकडाऊनची स्थिती निर्माण झालेली असताना पाटील यांनी मात्र, मास्क काढण्याचं समर्थन केल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
जयंत पाटील यांनी पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीत प्रचाराचा धडाका लावला आहे. पाटील यांनी प्रचारसभांवर भर दिला असून आघाडीचे उमेदवार भगीरथ भालके यांना निवडून देण्याचं आवाहन करत आहेत.
भगीरथ भालके यांना निवडून देण्यासाठी कार्यकर्त्यांनी चंग बांधला आहे. त्यामुळे रात्रीचा दिवस करा आणि भगीरथ यांना निवडून देऊन विधानसभेत पाठवा, असं आवाहन पाटील यांनी केलं आहे.