बागणी येथे पाणीपुरवठा संस्थेच्या सचिवास मारहाण
माझी अध्यक्षांवर पोलिसात गुन्हा दाखल

आष्टा :
बागणी (ता. वाळवा) येथे पैसे वसुलीच्या कारणावरून पांढर मळा सहकारी पाणीपुरवठा संस्थेच्या सचिवांना माजी अध्यक्षांनी मारहाण केली. याबाबत सचिव प्रदीप आनंदराव जाधव यांनी आष्टा पोलिसात फिर्याद दिली आहे.
बागणी येथे राजारामबापू कारखाना पुरस्कृत पांढर मळा पाणीपुरवठा संस्थेत प्रदीप जाधव सचिव म्हणून 2016 पासून कार्यरत आहेत. बागणी येथील काकासाहेब बाळू पाटील यांनी सहायक निबंधकांकडे सुनील कोठावळे व बबन पाटील यांची संस्थेच्या पैसे वसुली बाबत तक्रार केली होती. याबाबत संस्थेने वसुली कामी संबंधितांना नोटीस पाठवली होती.
27 जानेवारी रोजी बबन संपत पाटील यांचे 37 हजार 500 रुपये वसूल केले होते. दिनांक 15 रोजी बागणी येथील ग्रामपंचायती नजीक प्रदीप जाधव हे डिजिटल फलक लावत असताना सायंकाळी सहाच्या दरम्यान बबन पाटील यांनी प्रदीप जाधव यांना आमचे पैसे का घेतले? माझे पैसे द्या, म्हणून शिवीगाळ करून मारहाण केली.