रायगडावर संभाजीराजेंची जमिनीवर झोपून घेतला विसावा; लोक म्हणाले, ‘सर्वसामान्यांचे राजे दिसले’

रायगड :
छत्रपती संभाजीराजे यांचा एक फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सध्या व्हायरल झाला आहे. एक राजघराण्याचा माणूस, छत्रपतींचा वंशज जेव्हा रायगडाच्या एका झोपडीत विसावा घेतो, तेव्हा ते दृश्य बघून अभिमान वाटणं हे साहजिकच आहे. सध्या संभाजीराजेंचा हा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
दरम्यान,संभाजीराजे आज सकाळी रायगडावर तेथील सुरू असलेल्या कामकाजाची पाहणी करण्यासाठी गेले होते. ते दुपारी 12 वाजनेच्या सुमारास गडाच्या पायथ्याशी पोहचले. त्यांनी गडावरील कामकाजाची पाहणी केली. सध्या गडावरील रोप वे बंद असल्यामुळे संभाजीराजे यांनी पायऱ्या चढून सुरू असलेल्या कामांची पाहणी केली. डोक्यावर आग ओकणारा सूर्य आणि रायगड सर करून संभाजीराजे थकले. त्यांनी रायगडावर असलेल्या एका झोपडीत थोडा वेळ आराम केला. यावेळी त्यांनी सर्वसामान्यांप्रमाणे जमिनीवर झोपून विश्रांती घेतली.
संभाजीराजे यांचा रायगडावर एका झोपडीत विश्रांती करत असल्याचा क्षण त्यांचे स्वीय सहायक केदार योगेश यांनी कॅमेऱ्यात कैद केला. त्यानंतर त्यांनी सोशल मीडियावर हा फोटो शेअर केला. “राजे हा फोटो लाखो लोकांच्या काळजाचा विषय झाला आहे. सर्वसामान्य माणसामध्ये रमणारा राजा माणूस. गडकोटांच्या रक्षणाचा ध्यास घेऊन सतत कार्यरत असणारे राजे महाराष्ट्राने पाहिले. उन्हाच्या काहिलीमुळे थकून रायगडाच्या झोपडीच्या आश्रयाने थोडीशी विश्रांती घेताना पाहून राज्यातील जनता सुखावली. ” असं केदार योगेश म्हणाले
तसेच संभाजीराजे यांनी देखील आपल्या अधिकृत फेसबुक आणि ट्विटर अकाउंटवर या दौऱ्याबाबत माहिती दिलीय. या माहितीसोबत त्यांनी काही फोटो शेअर केले आहेत.