महावीर जयंती साधेपणाने साजरी करण्याची जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना

रोहन भिऊंगडे/
कोल्हापूर, दि. 22 : कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी लोकांनी एकत्र न येता साधेपणाने महावीर जयंती साजरी करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिल्या आहेत.
कोरोना विषाणूचा मोठ्या प्रमाणात प्रसार होत आहे. कोरोना संकटामुळे यावर्षी सर्व धर्मीय सण, उत्सव तसेच कार्यक्रम अतिशय साधेपणाने साजरे करण्यात येत आहेत. यावर्षी दि. 25 एप्रिल रोजी महावीर जयंती साजरी करण्यात येणार आहे.
या सणाच्या दिवशी नागरीक मोठया प्रमाणात एकत्र येतात. राज्यात सुरु असलेला कोरोनाचा वाढता प्रार्दुभाव पाहता शासनाच्या दिनांक 13 एप्रिल 2021 च्या आदेशानुसार महावीर जयंती साधेपणाने साजरी करणे आवश्यक आहे.
महावीर जयंती साजरी करण्याच्या अनुषंगाने खालीलप्रमाणे मार्गदर्शक सूचना देण्यात येत आहेत :-
१) महावीर जयंती उत्सव लोक मोठया प्रमाणात एकत्रित येऊन साजरी करतात.परंतु यावर्षी कोविड-19 चा प्रादुर्भाव टाळण्यासाठी लोकांनी एकत्र न येता साधेपणाने आपआपल्या घरी महावीर जयंती उत्सव साजरा करणे अपेक्षित आहे.
२) कोविड-19 चा वाढता प्रादुर्भाव पाहता सर्व धार्मिक स्थळे बंद ठेवण्यात आली असल्याने मंदीरात पुजाअर्चा व दर्शनासाठी जाता येणार नाही.
३) मंदीरामधील व्यवस्थापक/विश्वस्त यांनी शक्य असल्यास दर्शनाची ऑनलाईन सुविधा,केबल नेटवर्क,वेबसाईट व फेसबुक इत्यादीव्दारे उपलब्ध करुन घ्यावी.
४) महावीर जयंती उत्सवा निमित्त कोणत्याही प्रकारे प्रभात फेरी,मिरवणूका काढण्यात येऊ नये.
५) कोविड-19 च्या विषाणूंचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन,आरोग्य,पर्यावरण,वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित नगरपालिका, पोलीस प्रशासन, स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे काटेकोरपणे अनुपालन करणे बंधनकारक राहिल.तसेच या आदेशानंतर व प्रत्यक्ष महावीर जयंती सण सुरु होण्याच्या मधल्या कालावधीत शासन स्तरावरुन व या कार्यालयाकडून तसेच स्थानिक प्रशासनाकडून काही नवीन सुचना प्रसिध्द झाल्यास त्याचे देखील अनुपालन करणे बंधनकारक राहिल.