लोकशाहीच्या तत्त्वावर राष्ट्रवादी पक्ष जनसामान्यांमध्ये वाढू शकतो : जयंत पाटील ; आदमापूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस परिसंवाद यात्रा संपन्न

मुदाळतिट्टा प्रतिनिधी :
यूथ आणि बूथ कमिटीमुळे सामान्य घरातली माणसे राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर जाऊ शकतात, हीच लोकशाहीची ताकद आहे. त्याच तत्त्वावर आपला पक्ष जनसामान्यांमध्ये वाढू शकतो. पक्ष वाढवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करा, असे आवाहन राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष मंत्री जयंत पाटील यांनी केले.आदमापूर (ता. भुदरगड) येथे राष्ट्रवादी काँग्रेस परिसंवाद यात्रेत अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.
यावेळी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, माजी आमदार के. पी. पाटील, जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील उपस्थित होते. ना. पाटील म्हणाले, देशातील सहकारी संस्थांची स्थिती चिंताजनक असताना के. पी. पाटील यांनी कोल्हापूर बाजार समिती, हुतात्मा स्वामी सूत गिरणी, बिद्री सहकारी साखर कारखाना उत्तम प्रकारे चालविले आहेत.
गेली दोन वेळा राधानगरी विधानसभा निवडणुकीत आपण का पराभूत झालो?, याची कारणे आपल्याला माहीत आहेत, त्यामध्ये दुरुस्ती होणे गरजेचे आहे.ना. मुश्रीफ म्हणाले, के . पी. पाटील व ए. वाय. पाटील हे राधानगरी मतदारसंघातील दोन नेते राष्ट्रवादी काँग्रेसची जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी गेले अनेक वर्षे सांभाळत आहेत. 2024 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राज्यात एक नंबरचा झाल्याशिवाय राहणार नाही. जी मंडळी पुरोगामी विचारसरणीच्या शरद पवार यांच्यावर टीका करतात, त्यांना उत्तर देण्यासाठी कोल्हापूर येथे जाहीर सभेचे आयोजन केल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.