केंद्रीय विद्यामंदिर गारगोटी प्रशालेच्या अध्यापिका रूपाली कुंभार यांना जनकल्याण सामाजिक सेवा संस्थेचा राज्यस्तरीय आदर्श शिक्षका पुरस्कार प्रदान

कोल्हापूर प्रतिनिधी :
केंद्रीय विद्यामंदिर गारगोटी प्रशालेच्या अध्यापिका रूपाली सुभाष कुंभार यांना यावर्षीचा जनकल्याण सामाजिक सेवा संस्था, कोल्हापूर यांच्याकडून देण्यात येणारा राज्यस्तरीय आदर्श शिक्षिका पुरस्कार प्रदान करण्यात आला. कोल्हापुरी फेटा, श्रीफळ, सन्मानचिन्ह आणि गौरव पत्र देऊन रूपाली कुंभार यांना यावेळी सन्मानित करण्यात आले.
जवळपास २४ वर्ष शिक्षण क्षेत्रात अध्यापक म्हणून कार्यरत असताना त्यांनी अनेक विद्यार्थी घडविण्याचे कार्य केले आहे. भुदरगड टॅलेंट सर्च परीक्षेसाठी अथक परिश्रम घेऊन नेहमीच आपला वर्ग गुणवत्ता यादीत येण्यासाठी त्या प्रयत्नशील असतात. तालुका स्तरावर शिक्षक व विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांमध्ये त्यांचा विद्यार्थ्यांसह सहभाग असतो. शेणगांव मध्ये देखील त्या सामाजिक कार्यात अग्रेसर असतात. याचीच दखल घेऊन रुपाली सुभाष कुंभार यांची “राज्यस्तरीय आदर्श शिक्षिका” पुरस्कारासाठी निवड करण्यात आली असल्याचे जनकल्याण सामाजिक सेवा संस्था, कोल्हापूर चे अध्यक्ष उदयसिंह पाटील यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले.
शेणगांव गावचे माजी सरपंच एन. डी. कुंभार यांच्या त्या स्नुषा आहेत. त्याचबरोबर शेणगांव चे युवा नेते माजी ग्रामपंचायत सदस्य, भुदरगड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलचे सरचिटणीस सुभाष कुंभार यांच्या त्या पत्नी आहेत. पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर विविध स्तरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला.