पंढरपुरात राष्ट्रवादीविरोधात बंडखोरी ; शिवसेनेकडून आपल्याच पक्षाच्या नेत्याची हकालपट्टी

पंढरपूर :
राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपमधील लढाईमुळे अत्यंत प्रतिष्ठेच्या झालेल्या पंढरपूर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत दररोज नवनवे वळण येत आहेत. यामध्ये आता राष्ट्रवादी काँग्रेससाठी शिवसेनेने आपल्याच पक्षातील नेत्याची हकालपट्टी केल्याची माहिती आहे.
शिवसेनेच्या महिला आघाडीच्या जिल्हा संघटिका शैला गोडसे यांनी या पोटनिवडणुकीत महाविकासआघाडीचे उमेदवार भगीरथ भारत भालके यांच्याविरोधात उमेदवारी अर्ज दाखल केला होता. यामुळे महाविकासआघाडीत बिघाडी होण्याची शक्यता होती. त्यामुळे शिवसेनेने शैला गोडसे यांना सरळ बाहेरचा रस्ता दाखवला आहे.
राष्ट्रवादीचे माजी आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर ही जागा रिक्त झाली होती. त्यानंतर होणारी पोटनिवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांनी प्रतिष्ठेची केली आहे. सांगली आणि जळगाव महानगरापालिकेत ओढावलेल्या नामुष्कीनंतर भाजपने आता पंढरपुरात संपूर्ण राजकीय ताकद पणाला लावायची ठरवली आहे. त्यासाठी भाजपकडून समाधाना आवताडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
तर राष्ट्रवादीने भारत भालकेंचे सुपुत्र भगीरथ भालके यांना उमेदवारी दिली आहे. दोन्ही उमेदवारांचे अर्ज आज दाखल करण्यात आले. यानिमित्ताने भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष आमने – सामने आल्याची माहिती आहे .