आषाढीवारीसाठी वैद्यकीय साधनांनी सज्ज असलेल्या 75 रुग्णवाहिका तैनात ; ‘बीव्हीजी’कडून वारकऱ्यांची अनोखी सेवा

आषाढी वारीत २०१४ पासून आजपर्यंत ४५२९ गंभीर आजारी वारकऱ्यांना जीवनदान देणाऱ्या आणि दोन लाख ६१ हजार ६३० वारकऱ्यांना जागेवर उपचार देणाऱ्या बीव्हीजी व महाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय सेवा डायल १०८ च्या वतीने यंदाही आषाढीवारीत वारकऱ्यांना प्रभावी वैद्यकीय सेवा दिली जाणार आहे.
त्यासाठी अत्याधुनिक वैद्यकीय साधनांनी सज्ज असलेल्या ७५ रुग्णवाहिका तैनात केल्या आहेत. बीव्हीजीचे प्रमुख हनुमंत गायकवाड, अधिकारी डॉ. ज्ञानेश्वर शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली बीव्हीजी एमईएमएस यांच्या वतीने नेहमीच मानवतेतून सेवा करण्याचे आणि गंभीर आपत्तींचे व्यवस्थापन चांगल्या प्रकारे करण्याचे कार्य केले जात आहे.
याआधी विभागीय व्यवस्थापक विठ्ठल बोडखे, जिल्हा व्यवस्थापक डॉ. प्रियंक जवाळे, राजेंद्र कदम, डॉ. अनिल काळे यांनी आषाढीवारीच्या काळात रुग्णांचे प्राण वाचविण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. यावर्षीच्या वारीतही बीव्हीजी व महाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय सेवा डायल १०८ यांनी आषाढीवारी २०२३ साठी जिल्हानिहाय रुग्णवाहिकेचे स्वतंत्र नियोजन केले आहे.
७५ रुग्णवाहिका संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा, संत तुकाराम महाराज पालखी सोहळा, संत सोपान महाराज पालखी सोहळा, या पालखी सोहळ्याच्या प्रस्थानापासून पंढरपूरपर्यंत व पंढरपूरमध्येही डायल १०८ सुविधेचा उपयोग वारकऱ्यांना घेता येईल. या ७५ रुग्णवाहिकांमध्ये व्हेंटिलेटर, हृदयविकाराचा झटका आल्यास तातडीचे उपचार सुविधा असलेल्या २२ तर ऑक्सिजन, इतर औषधे असलेल्या ५३ रुग्णवाहिकांचा समावेश आहे. पालखीसोबत व पालखी मार्गावर ठिकठिकाणी डायल १०८ रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. कुठलाही आपत्कालीन वैद्यकीय प्रसंग उद्भवल्यास १०८ टोल फ्री क्रमांकावर कॉल केल्यास वारकऱ्यांना तत्काळ रुग्णवाहिका उपलब्ध होणार आहे.
वारकऱ्यांच्या सेवेसाठी….
पुणे जिल्हा : ५३ रुग्णवाहिका
सातारा जिल्हा : ६ रुग्णवाहिका
सोलापूर जिल्हा : १६ रुग्णवाहिका
पंढरपूर शहर : २९ जुलैला (आषाढी एकादशीदिनी) १५ स्वतंत्र रुग्णवाहिका
एकूण रुग्णवाहिका : ७५
पंढरपूरमध्ये डायल १०८ चे नियंत्रण कक्ष सुरू करण्यात येणार आहे.