राधानगरी : कुडूत्री गावाला परंपरेने वाजंत्री सेवा देणारे : गौस बेगुलजी

कुडूत्री प्रतिनिधी : सुभाष चौगले
कुडूत्री (ता.राधानगरी) गावात कोणताही सण, उत्सव, अगर धार्मिक ,लग्न समारंभ किंवा अन्य कार्यक्रम असूदे वाजंत्री आल्याशिवाय तो पार पडत नाही अथवा ढोल व ताशा पुढे वाजल्याशिवय त्याला शोभा येत नाही.ते म्हणजे तुरंबे येथील वाजंत्री गौस बालेचांद बेगुलजी होय.आपल्या पूर्वजांचा सातव्या पिढीतील ते सद्या वाजंत्री म्हणून वारसा चालवत आहेत. त्यांचे कुडूत्री गाव पांढरी साठी चाललेली पिढ्यानपिढ्याची सेवा लाखमोलाची ठरत आहे.
गौस बेगुलजी हे मुस्लिम समाजातील असून ते मुळ गाव तुरंबे येथे सद्या वास्तव्य करत आहेत.अगदी लहानपणापासून त्यांनी वाजंत्री म्हणून कुडूत्री गावात काम पाहत आहेत.गावातील कोणताही कार्यक्रम असूदे ते न चुकता गावामधे नित्य नियमाने हजर होतात.त्यांना आपल्या तुरंबे गावातील सणांचा आनंद लुटता येत नाही पण ते कुडूत्री गावात सणासाठी हजर होतात.हे त्यांचे विशेष आहे.गावात चालणारे ,खेळ, धुलीवंदन,दसरा,पांडुरंग सप्ताह, गाव जत्रा,गौरी गणपती विसर्जन,गावातील लग्नसोहळा,गावातील अन्य कार्यक्रम यासाठी ताशा आणि ढोल घेऊन ते हजर होतात.
आजचा महागाईचा जमाना पाहिला तर अगदी अल्प मोबदल्यात हे काम केले जाते.पण तेही खुशीने केले जाते.कधी कोणावर सक्ती केली जात नाही. कोण देईल ते आर्थिक सहकार्य व मिळेल ते भात (धान्य) या मध्ये ते समाधान मानतात.जणू गावच हा आपला म्हणून ते येथे काम पाहतात.
सेवेत कमी पडणार नाही . . .
आपल्या जीवात जीव असे पर्यंत आपण या कुडूत्री गावची आपल्या पूर्वजांप्रमाणे सेवा करणार असल्याचे गौस बेगुलजी यांनी निकाल न्यूज शी बोलताना सांगितले.