शिवराजमधील माजी शिक्षकांच्या भेटीने जुन्या स्मृतीना मिळाला उजाळा : पारितोषिक वितरण सोहळा संपन्न

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
शिवराज हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या गेल्या 73 वर्षात सेवा बजावलेल्या सर्व माजी शिक्षक- शिक्षकेत्तर कर्मचारी व नातेवाईक यांच्या उपस्थितीत यावेळी येथील ‘शिवराज’चा वार्षिक क्रीडा महोत्सव पारितोषिक वितरण समारंभ संपन्न झाला. संस्थेचे अध्यक्ष गजाननराव गंगापुरे, माजी शिक्षण संचालक महावीर माने, कार्यावाह आण्णासाो थोरवत, प्राचार्य पी. डी. माने यांच्यासह गेल्या 73 वर्षातील शाळेत ज्ञानदानाचे महत कार्य केलेल्या सेवानिवृत्त शिक्षक, शिक्षकेत्तर आणि त्यांच्या नातेवाईकांनी यावेळी प्रमुख उपस्थिती द़र्शवली. शिवराजच्या वतीने त्यांचा ऱ्हद्य सत्कार करण्यात आला.
वार्षिक क्रीडा महोत्सव बक्षीस वितरण समारंभासाठी सर्वत्र सेलिब्रेटी आणण्याची प्रथा आहे. तथापि ‘शिवराज’ने ज्ञानमंदिराची पायाभरणी करून त्याचा कळस चढवण्यापर्यंत योगदान दिलेल्या सर्व शिक्षक- शिक्षकेत्तरांना आणण्याचा निर्णय घेतला. ही सर्व मंडळी आल्यानंतर जुन्या स्मृतींना उजाळा मिळाला. हयात असलेले शिवाजीयन्स आणि हयात नसलेल्यांचे नातेवाईक यामुळे शिवराजचा परिसर फुलून गेला. साऱ्यांनाच आपल्या कार्याचे सार्थक झाल्याची भावना दाटून आली आणि जुन्या स्मृतींना उजाळा मिळाला. अध्यक्ष गजाननराव गंगापुरे यांनी शाळेच्या क्रीडाविषयक कामगिरीचा गौरव करून गुणवत्तेतही उच्चांक करण्याचे आवाहन केले. तर माजी शिक्षण संचालक महावीर माने यांनी बदलत्या शैक्षणिक प्रवाहातील मराठी शिक्षणाचे महत्त्व विषद केले.
यावेळी शाळेचे राष्ट्रीय व राज्य खेळाडू शिवानी मेटकर, गौरी पाटील, तन्वी मगदूम, अदित्य दिवटे, सुमित रेपे, वृषाली पाटील, जान्हवी भारमल, वरद चौगले, मयूर असवले, विभा पाटील, श्रेया गोंधळी, राजवीर जाधव, सोहम जाधव, अर्चना पाटील, ओंकार सुतार यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
स्वागत उपमुख्याध्यापक रवींद्र शिंदे प्रास्ताविक प्राचार्य पी. डी. माने, सूत्रसंचालन अविनाश चौगुले यांनी केले तर आभार उपप्राचार्य एल. व्ही. शर्मा यांनी मानले.