शाहूपुरीतील मे. सह्याद्री ऑटोमोबाईल काळ्या यादीत ; वितरकांकडून यंत्र , अवजारे खरेदी न करण्याचे आवाहन : कृषि अधिकारी ज्ञानदेव वाकुरे

प्रतिनिधी : रोहन भिऊंगडे
कृषि विभागाकडून विविध कृषि यांत्रिकीकरण योजनेमधून ट्रक्टर, पॉवर टिलर व अन्य अवजारे खरेदीकरिता अनुदान अनुज्ञेय आहे. मे. सह्याद्री ऑटोमोबाईल, शाहूपुरी यांना काळ्या यादीत टाकण्यात आले असून या वितरकाकडून यंत्र/ अवजारे खरेदी केल्यास ते अनुदानास पात्र राहणार नाहीत. या फर्ममधून ट्रॅक्टर, पॉवर टिलर अथवा अन्य कृषि अवजारे खरेदी केल्यास या अवजारे/यंत्र यांना अनुदान मंजूर केले जाणार नाही, याची सर्व शेतकरी बांधवांनी नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी ज्ञानदेव वाकुरे यांनी केले आहे.
केंद्र शासनाच्या मान्यताप्राप्त संस्थांकडून तपासणी केलेल्या ट्रॅक्टर, पॉवर टिलर व अवजारांची यादी farmech.dac.gov.in या पोर्टलवर वेळोवेळी अद्यावत करण्यात येते. या यादीमध्ये समाविष्ट असलेली किंवा ट्रॅक्टर, पॉवर टिलर वगळता इतर अवजारांच्याबाबतीत केंद्र शासनाच्या मान्यताप्राप्त तपासणी संस्थेकडील वैध तपासणी अहवाल उपलब्ध असलेल्या अवजारांनाच कृषि विभागाकडील यांत्रिकीकरणाचे विविध योजनांमधून अनुदान अनुज्ञेय आहे. जिल्ह्यामधील मे. सह्याद्री ऑटोमोबाइल, शाहूपुरी या वितरकाने या योजना मार्गदर्शक सूचनेस अनुसरुन राबविण्यामध्ये सहभागी न होता चुकीच्या पध्दतीने कामकाज केलेले आहे. यामध्ये त्यांच्याकडून पॉवर टिलर घेतलेल्या शेतकऱ्यांची त्यामुळे फसवणुक झाली आहे.