इचलकरंजी महावितरणचे कार्यकारी अभियंता ३० हजार रुपयांची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात

कोल्हापूर प्रतिनिधी : विजय मोरबाळे
येथील महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या (महावितरण) उपविभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत राठी यांना १८ फ्लॅटच्या इलेक्ट्रिकल कामाच्या मंजुरीसाठी ३० हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहाथ पकडले. ही कारवाई कोल्हापूर एसीबीच्या पथकाने केली.
तक्रारदार हे एक इलेक्ट्रिकल कंत्राटदार असून ते इमारतींमधील इलेक्ट्रिकल फिटिंगची कामे करतात. त्यांनी इचलकरंजीतील एका अपार्टमेंटमधील १८ फ्लॅटच्या वीज जोडणीचे काम घेतले होते. या कामाच्या मंजुरीसाठी आवश्यक अर्ज आणि कागदपत्रे तक्रारदारांनी महावितरणच्या इचलकरंजी कार्यालयात सादर केली होती.
या अर्जाला मंजुरी देण्यासाठी तक्रारदारांनी कार्यकारी अभियंता प्रशांत राठी यांची भेट घेतली. त्यावेळी राठी यांनी १८ फ्लॅटसाठी प्रत्येकी ५ हजार रुपये म्हणजेच एकूण ९० हजार रुपयांची लाच मागितली. लाच दिल्यासच ते प्रकरण मंजूर करतील, असे त्यांनी तक्रारदाराला सांगितले.
या मागणीनंतर तक्रारदाराने कोल्हापूरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार दाखल केली. एसीबीच्या अधिकाऱ्यांनी तक्रारीची पडताळणी केली असता, कार्यकारी अभियंता प्रशांत राठी यांनी ९० हजार रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. तडजोडीअंती ३० हजार रुपये देण्याचे ठरल्यानंतर एसीबीने सापळा रचला.