गारगोटी : टँकरद्वारे पाणी देत झाडांचे संरक्षण व संगोपन ; वाढदिनी कांतिभाई पटेल यांचा स्तुत्य उपक्रम

खानापुर प्रतिनिधी :
खानापूर ता. भुदरगड येथील गडकोट अभ्यासक, निसर्गप्रेमी कांतिभाई पटेल यांनी निसर्ग जतन व संवर्धन काळाची गरज ओळखून, पर्यावरणात झाडांचे अनन्य साधारण महत्व अधोरेखित करत, आपल्या वाढदिनी झाडांना टँकरद्वारे पाणी व वृक्षारोपण करत पर्यावरण पुरक पद्धतीने वाढदिवस साजरा केला.
आजघडीला धावपळीच्या युगात वाढदिवस साजरा करण्याचे अनेकविध ट्रेंड पहायला मिळतात. तलवारीने केक कापण्यापासून ते चेहऱ्याला क्रीम फासने, अंड्याने न्हाऊ घालणे, आतषबाजी करणे अश्या अनेक क्लुप्त्या वापरत वाढदिवस साजरे केले जातात, खरतर पर्यावरणाचा , जैवविविधतेचा ऱ्हास मोठ्या प्रमाणात होत आहे, जंगलेच्या जंगले आगीच्या भक्ष्यस्थानी जात असून, काँक्रीटीकरणाचा विळखा जंगल संस्कृतीत घुसखोरी करत आहे, हे सत्य आपण नाकारू शकत नाही, हे शाश्वत सत्य स्वीकारून, ह्या सर्व गोष्टींच्या मुळाशी जाऊन, पर्यावरणाचा होणारा ऱ्हास काही अंशी का असेना कमी व्हायला हवा, झाडे लावायला हवीत, त्यांचं संरक्षण व संगोपन करण्याबरोबरच, जंगले अबाधित ठेवण्यासाठी प्रयत्नशील रहायला हवं अन ह्या सर्व गोष्टींच्या मुळाशी जाऊन खानापूर ता. भुदरगड येथील कांतिभाई पटेल ह्या गुजराती तरुणाने आपल्या गावा नजीकच्या तळेमाऊली पठारावरील रस्त्याच्या दुतर्फा असणाऱ्या झाडांना टँकरद्वारे 3500 लिटर पाणी दिले शिवाय वडाच्या झाडाचे रोपण केले.
वृक्षारोपण, टँकरद्वारे झाडांना पाणी देत, वाढदिनाच्या आधुनिक गोष्टीना फाटा देत, पर्यावरण पुरक पद्धतीने वाढदिवस साजरा केला. ह्या उपक्रमात कांती पटेल यांच्या सोबत सर्पमित्र अवधुत पाटील, यश पटेल, सिद्धी पाटील, नम्रता पाटील, जान्हवी पाटील, मिथाली पाटील, गोविंद नाईक आदींनी सहभाग घेतला.