बिद्रीच्या निवडणुकीत विरोधकांचे पानिपत होईल : पालकमंत्री हसन मुश्रीफ ; महालक्ष्मी शेतकरी विकास आघाडीची बोरवडेत विराट सभा

बिद्री ( प्रतिनिधी / अक्षय घोडके ) :
सभासदांच्या जीवनात आर्थिक उन्नतीचे स्त्रोत कायम राहावेत यासाठी अध्यक्ष के. पी. पाटील यांनी सहवीज, इथेनॉल सारखे प्रकल्प उभारून सभासदांच्या जीवनात आनंद फुलविण्याचे काम केले आहे. त्यामुळे के. पी. पाटील यांनीच बिद्रीचे खऱ्या अर्थाने नंदनवन केले असून या निवडणुकीत सुज्ञ सभासद विरोधकांचे पानिपत केल्याशिवाय राहणार नाहीत असा आत्मविश्वास जिल्ह्याचे पालकमंत्री नाम. हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला.
बोरवडे ( ता. कागल ) येथील जोतिबा चौकात झालेल्या श्री महालक्ष्मी शेतकरी विकास आघाडीच्या प्रचार सभेत ते बोलत होते. सभेच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नागरिक जोतीराम खाडे होते. यावेळी सभेला उच्चांकी गर्दी झाली होती तर सभास्थळी सर्वत्र पिवळ्या रंगाचे झेंडे आणि बॅनर लावल्याने वातावरण पिवळेधमक झाले होते.
मंत्री मुश्रीफ पुढे म्हणाले, के. पी. पाटील यांच्या अनुभवी व अभ्यासू व्यवस्थापनामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना सतत उच्चांकी दर मिळाला आहे. शिवाय तोडणी ओढणी वाहतूकदारांची ऊस बिले, कामगारांचे पगार आणि बोनस त्यांनी वेळच्यावेळी दिले आहेत. विरोधी आघाडीकडे टीका करण्याशिवाय दुसरा कोणताही मुद्दा नसल्याने या निवडणुकीत के. पी. पाटील यांचे पॅनल दहा हजारांहून अधिक मताधिक्याने विजयी होईल.
माजी आमदार संजयबाबा घाटगे म्हणाले, के. पी. पाटील म्हणजे बिद्री साखर कारखान्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या कष्टाला चांगले दाम देणारा आदर्श चेअरमन आहे. त्यांनी सहवीज, इथेनॉल आणि विस्तारीकरण आदी कामे करुन कारखाना प्रगतीपथावर नेला आहे. त्यामुळे त्यांच्याच हातात बिद्री कारखाना राहणे हे सभासद हिताचे आहे.
अध्यक्ष के. पी. पाटील म्हणाले, आपण बिद्री कारखान्यात केलेल्या विकासकामांच्या जोरावर सभासदांच्या समोर जात असून विरोधक आपल्यावर बिनबुडाचे आरोप करत आहेत. आपल्यावर उठ सूट भ्रष्टाचाराचे आरोप करून आपली प्रतिष्ठा मलीन करण्याचा प्रयत्न विरोधक करत आहेत. परंतु सुज्ञ सभासद या निवडणुकीत ते आपल्या संपूर्ण पॅनेलला मोठ्या मताधिक्याने विजयी करुन विरोधकांना त्यांची जागा दाखविल्याशिवाय राहणार नाहीत.
उपस्थितांचे स्वागत जिल्हा परिषद सदस्य मनोज फराकटे यांनी केले. उमेदवारांची ओळख अशोक कांबळे यांनी करुन दिली. याप्रसंगी गोकुळचे संचालक अमरीश घाटगे, बिद्रीचे संचालक प्रवीण भोसले, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख प्रकाश पाटील, सुदाम साबळे, ओंकार चव्हाण यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी बिद्रीचे संचालक गणपतराव फराकटे, माजी पंचायत समिती सदस्या शोभाताई फराकटे, माजी सरपंच रघुनाथ कुंभार, अन्नपूर्णा शुगरचे संचालक आनंदराव साठे, उपसरपंच विनोद वारके, माजी उपसरपंच ज्ञानदेव फराकटे, साताप्पा साठे, फराकटेवाडीचे माजी सरपंच बाळासाहेब फराकटे, माजी उपसरपंच के.के. फराकटे, तानाजी शामराव साठे, आनंदराव फराकटे यांच्यासह ग्रामस्थ ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित होते.
सूत्रसंचालन सुनील माजगावकर यांनी केले तर आभार उपसरपंच विनोद वारके यांनी मानले.
के. पीं. च्या शिक्षणसंस्थेवर आरोप करणारे बालबुद्धीचे
माजी आम. संजयबाबा घाटगे म्हणाले, के. पी. पाटील यांच्या चांगल्या चाललेल्या शिक्षण संस्थेवर विरोधक राजकीय हेतूने चिखलफेक करत आहेत. या शिक्षण संस्थेत सर्वसामान्यांची मुले शिक्षण घेत असून ती अनेक विद्यार्थ्यांची आधारवड ठरत आहे. यामागे विकास पाटील आणि रणजित पाटील या बंधूंचे कठोर परिश्रम आणि अविरत प्रयत्न कारणीभूत ठरले आहेत. परंतु अशा चांगल्या चाललेल्या संस्थेवर आरोप करणाऱ्या विरोधकांच्या बालबुद्धीची आपल्याला कीव येते अशी जोरदार टीकाही त्यांनी आपल्या मनोगतातून केली.

बोरवडे : येथे महालक्ष्मी शेतकरी विकास आघाडीच्या प्रचार सभेवेळी बोलताना पालकमंत्री हसन मुश्रीफ, समोर उपस्थित जनसमुदाय .