सरसेनापती संताजी घोरपडे यांचे स्मारक बघायला देशातील इतिहासप्रेमी व पर्यटक येतील : सेनापती कापशी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचा विश्वास; येथे विकास कामांचा लोकार्पण समारंभ व बांधकाम कामगारांना सुरक्षा साहित्य वाटप.

सेनापती कापशी :
सेनापती कापशीला मोठा ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे.येथील सरसेनापती संताजी घोरपडे यांच्या स्मारकाचे काम भाजप सरकारच्या काळात रखडले होते. या स्मारकासाठी नुकताच सुमारे सात कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असुन महान मराठा योद्धे सरसेनापती संताजी घोरपडे यांचे स्मारक बघायला देशभरातील इतिहासप्रेमी व पर्यटक येतील, असा विश्वास ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला. अशा महान मराठा योद्ध्याचे स्मारक आपल्या हातून पूर्णत्वाला जात असल्याचे भाग्य मला मिळाले , असेही ते म्हणाले.
सेनापती कापशी (ता. कागल) येथे विविध विकास कामांचे उद्घाटन, लोकार्पण सोहळा व ८०० बांधकाम कामगारांना सुरक्षा साहित्य वाटप अशा संयुक्त कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद सदस्या शिल्पा शशिकांत खोत होत्या.
यावेळी मंत्री मुश्रीफ म्हणाले, आपण याआधी मंत्री असताना या स्मारकासाठी पाच कोटी रुपये निधीची तरतूद केली होती, त्यापैकी दोन कोटी रुपये खर्च झाले आहेत. येत्या वर्षभरात या मराठा योद्धा चे स्मारक उभारणीचे काम पूर्ण करून उद्घाटन करण्यात येणार आहे.या भागातील सर्वच विकासकामे तातडीने पूर्ण करण्यात येणार आहेत.
यावेळी जिल्हा बँकेचे संचालक भैया माने म्हणाले, हसन मुश्रीफ यांच्या रूपाने महाविकास आघाडी सरकारमध्ये ग्रामविकास सारखे वजनदार खात्याचे मंत्रिपद तालुक्याला मिळाले आहे.त्यामुळे गेल्या दोन वर्षांत महाराष्ट्रात सर्वात जास्त विकासकामे कागल – गडहिंग्लज मतदारसंघात झाली आहेत.
युवानेते शशिकांत खोत म्हणाले, मंत्री हसन मुश्रीफ यांनी सेनापती कापशी येथील विकासकामांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. जयसिंगराव घोरपडे सरकार यांनी तात्कालीन बालोद्यानला जागा दिली होती.त्यामुळे या बालोद्यान ला जयसिंगराव पार्क बालोद्यान असे नाव देण्यात आले आहे .
प्रविण नाईकवाडी यांनी स्वागत, सुर्यकांत भोसले यांनी प्रास्ताविक तर राजेंद्र माळी यांनी आभार मानले.विशाल कुंभार यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी जि.प.सदस्य युवराज पाटील, अंकुश पाटील,जोती मुसळे, माजी उपसभापती दिपक सोनार, शामराव पाटील, बाळासाहेब खतकल्ले,धनाजी तोरस्कर, आदींसह चिकोत्रा खोर्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सरसेनापतींची तलवार आणि गरिबांचा शाप……..
मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, भाजप सरकारने सरसेनापती संताजी घोरपडे यांच्या स्मारकासाठी एक रुपयाचाही निधी दिला नाही. तसेच राजकीय आकसातून दीड हजार गोरगरीब निराधारांच्या पेन्शन बंद केल्या. सरसेनापतीनी सपासप चालवलेल्या तलवारीमुळे तसेच गोरगरीब निराधारांची पेन्शन बंद केल्यामुळे भाजप सरकारला लागलेल्या शापामुळे त्यांचे सरकार झाले नाही.