महा-ई-सेवा केंद्रामधून मिळणाऱ्या दाखल्यांसाठी आता दुप्पट दर ; नागरिक, विद्यार्थ्यांना आर्थिक भुर्दंड ; २५ एप्रिलपासून नवे दर लागू

निकाल न्यूज प्रतिनिधी : विजय मोरबाळे
महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाकडून राज्यातील महा-ई-सेवा केंद्रांमधून (आपले सरकार सेवा केंद्र) मिळणारे विविध दाखले आता दुपटीपेक्षा अधिक दराने नागरिकांच्या पदरात पडणार आहेत. पुर्वी या दाखल्यासाठी शासनाला सेवाशुल्क म्हणून ३३ रुपये ६० पैसे द्यावे लागत होते.आता हेच सेवा शुल्क आता ६९ रुपये द्यावे लागणार आहे. शासनाने दाखल्यांच्या सेवाशुल्कात दुपटीपेक्षा अधिक दराने वाढ केल्याने सर्वसामान्यांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे. सदरच्या सेवा शुल्कची वाढ २५ एप्रिलपासून लागू करण्यात आले आहे. या दरवाढीचा राज्यातील नागरिकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागणार आहे.
शासनाच्या २७ मार्च २०२५ रोजीच्या शासन निर्णयानुसार आपले सरकार सेवा केंद्राची संख्या दुप्पट करणे तसेच सेवा केंद्रातून देण्यात येणाऱ्या सेवांच्या दरात सुधारणे करणे व घरपोच सेवेबाबत निर्णय घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी सुरू केली आहे.
दिवसेंदिवस महागाई मध्ये झालेली वाढ, महाआयटी तसेच महा-ई-सेवा केंद्र चालकांकडून सेवांची दर वाढवणे बाबत करण्यात आलेली मागणीचा विचार करून शासनाने दरांमध्ये डबल वाढ केली आहे. तसेच नागरिकांना त्यांच्या मागणीनुसार महा-ई-सेवा केंद्रांमधून घरपोच सेवा पुरवणे बाबतचा ही निर्णय घेतला आहे.
नव्या शासन निर्णयानुसार प्रत्येक ग्रामपंचायत क्षेत्रांमध्ये दोन आपले सरकार सेवा केंद्र स्थापन करण्यात येणार आहेत तसेच २०११ च्या जनगणनेनुसार त्या गावची लोकसंख्या पाच हजारपेक्षा अधिक असल्यास किमान चार केंद्रे स्थापन करण्यात येणार आहेत. महानगरपालिका व नगरपरिषद मधील दहा हजार लोकसंख्येसाठी दोन केंद्र, नगरपंचायत क्षेत्रासाठी किमान दोन केंद्रे व पाच हजार पेक्षा अधिक लोकसंख्या असलेस चार केंद्र स्थापन करण्यात येणार आहेत.
या प्रमाणे शासनाने आपले सरकार सेवा केंद्रांमध्ये वाढ करण्याचाही निर्णय घेतला आहे.
या दाखल्यासाठी द्यावा लागणार आता दुप्पट दर…..
महा-ई-सेवा केंद्र मधून मिळणाऱ्या ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र, वंशावळीचे प्रमाणपत्र, दगड खाणपट्टा परवाना, अल्पभूधारक शेतकरी असल्याचे प्रतिज्ञापत्र, पत दाखला, जन्माबाबत दाखला, मिळकतीचे प्रमाणपत्र, वय अधिवास आणि राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र, गौण खनिज परवाना, वारसा प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र, सांस्कृतिक कार्यक्रम परवाना, स्टोन क्रशर परवाना, मृत्यूबाबत दाखला, सर्वसाधारण प्रतिज्ञापत्र, जातीचा दाखला, नॉन क्रिमिलेअर दाखला, भूमीहीन शेतकरी दाखला, नवीन शिधापत्रिका, दुबार शिधापत्रिका, शिधापत्रिकेत युनिट कमी/वाढ करणे, विभक्त शिधापत्रिका, शिधापत्रिकेच्या तपशिलात बदल. या विविध दाखल्यासाठी आता दुप्पटीपेक्षा अधिक दर द्यावा लागणार आहे.
अशी असेल दरवाढ….
सरकारी शुल्क १० रुपये, पोर्टलचे शुल्क ५० रुपये, राज्य जीएसटी ४ रुपये ५० पैसै, केंद्र जीएसटी ४ रुपये ५० पैसै. असे एकूण ६९ रुपये सेवाशुल्क एका दाखल्या मागे नागरिकांना द्यावे लागणार आहेत.
” शासनाने महा-ई-सेवा केंद्र तथा आपले सरकार सेवा केंद्रांमधून मिळणाऱ्या दाखल्यांचे दर हे पूर्वी मिळाणाऱ्या दरामध्ये दुपटीपेक्षा अधिक दरवाढ केलेली आहे. त्यामुळे नाईलाजास्तव नागरिकांचा विविध दाखल्यांसाठी आर्थिक झळ सोसावी लागणार आहे.
” डॉ: सतीश निकम, सिध्दनेर्ली
अध्यक्ष – कागल तालुका महा ई सेवा केंद्र चालक संघटना.