गुडाळ येथे नऊ कोरोना बाधित : पुढील चार दिवस गावं पूर्णपणे बंद

कुडूत्री प्रतिनिधी :
गुडाळ (ता.राधानगरी) येथे गेल्या पाच दिवसांत नऊ जणांना कोरोना संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाल्याने गावात खळबळ उडाली आहे. सर्वच बाधित रूग्णांवर गारगोटी,कोल्हापुर तसेच राधानगरी ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दरम्यान खबरदारीचा उपाय म्हणून पुढील चार दिवसांसाठी गावातील सर्वच व्यवहार बंद ठेवण्यात आले असून गावातील प्रमुख मार्गांसह अंतर्गत रस्तेही सील केले आहेत. आरोग्य विभागाच्यावतीने कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीची आरोग्य तपासणी सुरू आहे.
येथे एका लग्नसमारंभा नंतर नवरदेवासह नात्यातील मावशीला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले.त्यानंतर गेल्या पाच दिवसांत टप्प्याटप्प्याने नऊ जणांचे कोरोनाचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये चार महिला व पाच पुरुषांचा समावेश आहे.आणखीन एक अहवाल प्रतिक्षेत आहे.
दरम्यान गुरुवार सायंकाळी प्रांताधिकारी प्रसन्नजीत प्रधान यांनी गावाला भेट देऊन याबाबतची माहिती घेतली.त्यानंतर सरपंच अश्विनी पाटील, सर्कल कदम,आरोग्य विभाग, दक्षता कमिटी यांच्याबरोबर झालेल्या चर्चेनंतर रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता अत्यावश्यक सेवा वगळता गावातील सर्वच व्यवहार चार दिवसासाठी पूर्ण बंद करण्याबरोबरच कडक लॉकडाऊन करण्याची सूचना त्यांनी दिल्या आहेत.