धक्कादायक : दुप्पट परताव्याच्या आमिषाने 5 कोटींची फसवणूक प्रकरणी गुन्हे शाखेकडून तिघांना अटक

अभासी चलनात गुंतवणूक केल्यास 200 दिवसांत दुप्पट रक्कम देण्याचे आमिष दाखवून अनेकांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. तर गुन्ह्यातील मुख्य आरोपी पसार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. याप्रकरणी लिनक्स ट्रेड युके या कंपनीचे (Linux Trade UK Company) संचालक निलेश जेधे, जीवन मागाडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला असून ते पसार झाले आहेत.
पोलिसांनी जेधे आणि मागाडे यांचे साथीदार सागर दत्तात्रय गोऱ्हे (वय 31, रा. नेहा कन्स्ट्रक्शन, धनकवडी), महेश लक्ष्मण भोसले (वय 34, रा. विवा सरोवर, जांभुळवाडी, आंबेगाव), ऋत्विक मोहन पांगारे (वय 23, रा. गगन समृद्धी सोसायटी, आंबेगाव पठार, धनकवडी) यांना अटक केली आहे. आरोपींविरुद्ध फसवणूक, महाराष्ट्र ठेवीदारांच्या वित्तीय संस्थेच्या हितसंबंधाचे संरक्षण अधिनियम कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपी जेधे आणि मागाडे यांनी पुण्यातील सिंहगड रोड परिसरातील वसंत सखा प्लाझा या इमारतीमध्ये लिनक्स ट्रेड डॉट युके या कंपनीच्या नावाने कार्यालय सुरु केले. त्यांनी अभासी चलनात गुंतवणूक केल्यास दोनशे दिवसात दुप्पट रक्कम देण्याचे आमिष दाखविले. सुरुवातीला परतावा दिल्याने अनेकांनी आरोपींवर विश्वास ठेवून गुंतवणूक केली. नागरिकांनी मोठ्या रक्कमा त्यांच्याकडे गुंतवल्याची माहिती पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट एकचे पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद यांनी दिली.जेधे आणि मागाडे हे मुख्य आरोपी असून ते फरार झाले आहेत. तर त्यांच्या तीन साथीदारांना अटक केली आहे.
पोलिसांनी आतापर्यंत केलेल्या तपासात आरोपींनी गुंतवणूकदारांची पाच कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे.ज्या गुंतवणूकदारांनी लिनक्स ट्रेड डॉट युके या कंपनीत पैसे गुंतवले असतील,अशा व्यक्तींनी गुन्हे शाखेच्या युनिट एककडे संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.