विकास कामांसह गावांच्या पुनर्वसनाबाबत मंत्री हसन मुश्रीफ यांनी घेतला आढावा ; मंत्रालयीन स्तरावरील बैठकीसह गावामध्ये प्रशासनाच्या वतीने भेटीचे आयोजन

प्रतिनिधी : विजय मोरबाळे
आंबेओहळ मधील उर्वरित पुनर्वसन, दूधगंगा प्रकल्पग्रस्त लाभार्थी, वाकी -वाडदे वसाहत तेथील अतिक्रमण, मळगे खुर्द मधील गायरानचा प्रश्न, हसुर बुद्रुक येथील मुळ गावठाणचा प्रश्न तसेच गडहिंग्लज येथील झोपडपट्टीतील मोजणीबाबत तसेच इतर विविध विकास कामांचा आढावा मंत्री हसन मुश्रीफ यांनी प्रशासनासोबत बैठक घेऊन घेतला.
यावेळी दूधगंगा प्रकल्पामधील जमीन संपादित केलेल्या नागरिकांनी त्यांच्या विविध अडचणी प्रशासनासमोर मांडल्या. दूधगंगा प्रकल्पातील संपादन करून शिल्लक राहिलेल्या जमिनी बाबतच्या प्रश्नासाठी वन विभागाशी चर्चा करणे गरजेचे असून मंत्रालयीन स्तरावर याबाबतची बैठक आयोजित करू, असे मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले. आंबेओहळ येथील प्रकल्पग्रस्तांच्या समस्या व त्यांची न्यायालयीन प्रक्रिया याबाबतची पाहणी करण्यासाठी तातडीने गावस्तरावर भेट देऊन प्रश्न मार्गी लावावेत, असेही निर्देश त्यांनी यावेळी दिले. त्यानुसार अतिरिक्त जिल्हाधिकारी 5 सप्टेंबर रोजी दुपारी 3.00 वाजता या विषयाबाबत संबंधितांबरोबर बैठक घेणार आहेत.
बैठकीला जिल्हाधिकारी राहुल रेखावार, अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, उपविभागीय अधिकारी कागल श्री. सुशांत बनसोडे, गडहिंग्लजचे उपविभागीय अधिकारी बाबासाहेब वाघमोडे, कार्यकारी अभियंता पाटबंधारे विभाग सौ स्मिता माने, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख, तहसीलदार कागल श्री जितेंद्र इंगळे व संबंधित इतर अधिकारी उपस्थित होते.
विविध गावांच्या पुनर्वसनानंतर निर्माण झालेल्या वसाहतींमध्ये जी काही कामे राहिली आहेत, त्याबाबतच्या पूर्तता तातडीने पूर्ण करा, अशा सूचना मंत्री श्री मुश्रीफ यांनी यावेळी दिल्या. वाकी- वाडदे, सिद्धनेर्ली, बाचणी अशा गावांमधील लाभधारकांच्या प्रॉपर्टी कार्डचा प्रश्न प्रलंबित आहे. त्याबाबत अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी उपस्थितांना तपशील सादर केले . ते म्हणाले, सध्या मूळ गावांमधील सर्वे पूर्ण करून प्रॉपर्टी कार्ड देण्याचे काम शासनाकडून सुरू आहे. तसेच, नव्याने आता वसाहती व पुनर्वसित गावांमधीलही लोकांना प्रॉपर्टी कार्ड देणे प्रक्रिया नुकतीच मंजूर झाली आहे. तेही येत्या काळात सर्वे करून प्रॉपर्टी कार्ड वाटपाचे काम सुरू होईल.
गडहिंग्लज येथील झोपडपट्टीतील मोजणी होऊन खातेदारांच्या नावे होणेबाबत नागरिकांकडून मागणी करण्यात आली. याबाबत मंत्री श्री. मुश्रीफ यांनी तातडीने अतिक्रमणाची मोजणी करून त्याबाबत पुढील कार्यवाही तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले. हिरण्यकेशी नदीतील वाळू उपसा धोरणा संदर्भात गडहिंग्लज च्या नागरिकांनी बैठकीत विविध मागण्या मांडल्या. यावेळी गावाकडून उपस्थितीबाबत निळे रेषा व लाल रेषा यामध्ये नव्याने सर्वेक्षण करण्याची गरज असल्याचे नमूद केले. त्यावेळी कार्यकारी अभियंता पाटबंधारे सौ. स्मिता माने यांनी याबाबतचा प्रस्ताव शासनाला पाठवला असून मंजुरीनंतर तातडीने त्याबाबत कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. यावेळी उपविभागीय अधिकारी कागल श्री. सुशांत बनसोडे यांना पुनर्वसित गावे व प्रकल्पग्रस्तांच्या समस्येबाबत प्रश्न सोडवण्यासाठी कागल तालुक्यातील मळगी खुर्द व हसूर बुद्रुक येथे गाव स्तरावर भेट देण्याच्या सूचना मंत्री हसन मुश्रीफ यांनी केल्या.
नाशिकच्या आरोग्य विद्यापीठाचे विभागीय केंद्र होणार कोल्हापुरात…..!
महाराष्ट्राचे एकमेव आरोग्य विद्यापीठ नाशिक येथे आहे. बैठकीत मंत्री श्री. मुश्रीफ यांनी नाशिकच्या आरोग्य विद्यापीठाची केंद्र कोल्हापुरात होण्यासाठी शेंडा पार्क येथील जागेची तरतूद करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांना दिल्या हे विभागीय केंद्र कोल्हापुरात झाल्यास कोल्हापूर सह सातारा सांगली सोलापूर तसेच; कोकण विभागातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथील विद्यार्थ्यांची चांगली सोय होईल.
आयटी पार्कमुळे दोन ते अडीच लाख नोकऱ्या उपलब्ध होतील……!
बैठकीत मंत्री श्री. मुश्रीफ यांनी आयटी पार्कसाठी ३२ एकर जागा राखीव ठेवण्याचा सूचना जिल्हाधिकारी श्री. राहुल रेखावार यांना दिल्या. हा आयटी पार्क कोल्हापुरात झाल्यास सुमारे दोन ते अडीच लाख नोकऱ्या उपलब्ध होतील.