कोल्हापूर : दागिन्यांसाठी महिलेचा खुन : गुन्हा उघडकीस

कोल्हापूर प्रतिनिधी :
कसबा बोरगाव ( ता. पन्हाळा ) येथील गेल्या १० ते १२ दिवसापासून बेपत्ता असलेल्या छबुताई केरबा पाटील ( वय – ५८) यांचा अंगावरील सोन्याचे दागिने चोरण्याच्या उद्देशाने हाताने गळा दाबून खून करण्यात आला असल्याचे स्पष्ट झाले आहे. या खुना बाबत असनडोली येथील प्रकाश कुंभार या आरोपीस पन्हाळा पोलिसांनी अटक केली आहे. पन्हाळा न्यायालयाने आरोपीस २२ मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
घटनास्थळी व स्थानिकांकडून समजलेल्या माहितीनुसार, खुनी प्रकाश कुंभार याने छबुताई पाटील या महिलेस शेतात काम करत असलेले पाहिले. त्यावेळी महिलेच्या अंगावरील दागिने पाहून त्याच्या तोंडाला पाणी सुटले
त्याने छबुताईंच्या मुलाला लग्नासाठी मुलगी दाखवण्याचा बहाणा केला. संशयित आरोपी प्रकाश सदाशिव कुंभार रा. असंडोली ( ता. गगनबावडा ) यांने छबुताई पाटील या महिलेस मोटर सायकल गाडीवरून पाठीमागे बसवून घोटवडे ( ता. पन्हाळा ) येथील गावच्या हद्दीत असलेल्या डोंगरात नेले. तेथे तिचा हाताने गळा दाबून खून केला व तिच्या अंगावरील चार तोळे दागिने काढून घेतले.
पुरवा नष्ट करण्याच्या उद्देशाने मयत छबुताई हिचे प्रेत पोत्यात घालून मोटर सायकलला पाठीमागे बांधून मार्गेवाडी ( ता. गगनबावडा ) गावच्या हद्दीत नेले. कुंभी नदीकाठी शेतालगतच्या झुडपात पोते टाकण्यात आले. अनेक बेपत्ता असलेल्या छबूताई पाटील यांचा पन्हाळा पोलिस शोध घेत होते. दरम्यान, महामार्ग पोलिस तौसिफ मुल्ला हे छबुताईच्या बेपत्ता होण्याचा तपास करत होते. हा तपास करत असताना त्यांनी गगन बावडा तसेच अन्य ठिकाणी सराफ व्यवसाय करणाऱ्यांवर नजर ठेवली होती. त्यानुसार गेल्या एक दोन दिवसात कोणी सोने विक्रीसाठी आले होते का? यांची माहिती घेत असताना एका सराफाकडून प्रकाश कुंभार याचा सुगावा लागला.