“गेल्या वर्षभरात कृष्णकुंज हा मंत्रालयाचा दुसरा पत्ता झाला होता, हे लक्षात ठेवा”

मुंबई :
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी रात्री राज्यातील जनतेला संबोधित केले. यावरून भाजपसह अन्य विरोधी पक्षांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी फेसबुक लाइव्ह करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लोकांना भेटत नव्हते, पण गेल्या वर्षभरात अनेकांनी राज ठाकरे यांची भेट घेऊन त्यांचे गाऱ्हाणे मांडले, अशी खोचक टीका संदीप देशपांडे यांनी केली.
मनसे नेते संदीप देशपांडे यांनी मुख्यमंत्री साहेब, तुमचं ऐकलं, आता आमचं ऐका…किंबुहना ऐकाच, असे म्हणत फेसबुक लाइव्ह केले. यावेळी त्यांनी कोरोना परिस्थिती, लॉकडाऊनची टांगती तलवार, आरोग्य यंत्रणा यांवरून ठाकरे सरकारवर निशाणा साधला. लॉकडाऊनची भीती जनतेला दाखवली जात आहेत. लॉकडाऊनच्या भीतीमुळे व्यापारी शेतकऱ्यांना कमी किंमत देत आहेत, असा दावा देशपांडे यांनी यावेळी केला.
कृष्णकुंज हा मंत्रालयाचा दुसरा पत्ता झाला होता
गेल्या वर्षभरात राज ठाकरे अनेकांना भेटले. डबेवाले, डॉक्टर, नर्सेस, आरोग्य सेवक, शिक्षक, मच्छिमार बांधव असोत, या सर्वांना राज ठाकरे भेटले. त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्यांना दिलासा देण्याचे काम सातत्याने आणि नियमितपणे राज ठाकरे यांनी केले. आमच्यावर टीका करण्याचा तुम्हांला बिलकूल अधिकार नाही. तुम्ही घरी बसून होता आणि राज ठाकरे जनतेला भेटत होते. गेल्या वर्षभरात कृष्णकुंज हा मंत्रालयाचा दुसरा पत्ता झाला होता. राज ठाकरे लोकांना भेटत असल्यामुळे कृष्णकुंजवर गर्दी वाढत होती. तुम्ही कोणालाच भेटत नव्हता, त्यामुळे तुमच्याकडे कोणीही येत नव्हते, असा टोला संदीप देशपांडे यांनी लगावला.
मुख्यमंत्र्यांकडून शिकण्याची गरज नाही
लोकांच्या मनातील मुख्यमंत्र्यांबद्दल विश्वासार्हता कमी झाली आहे. रस्त्यावर उतरून मदत कशी करायची, हे आता मुख्यमंत्र्यांकडून शिकण्याची गरज नाही. कोरोनाच्या काळात मनसे सैनिकांनी अगदी लाठ्या मारणाऱ्या पोलिसांपासून ते सामान्य नागरिकांपर्यंत सर्वांना शक्य ती सगळी मदत केली आहे. सरकारकडून काहीही मदत करण्यात आली नाही. कोरोना काळात जम्बो कोव्हिड सेंटर उभारून ओळखीच्या लोकांना काम देणे आणि पैसे वाटणे हेच काम सरकारने केले, अशी गंभीर टीका देशपांडे यांनी केली.
महापौर आणि अस्लम शेख यांच्यावर टीका
लॉकडाऊन नेमका कशासाठी करायचा आहे, हा प्रश्न अनेकांना पडला आहे. एक दिवसाच्या नर्सबाईंनी आम्हांला शिकवू नये, असा घणाघात संदीप देशपांडे यांनी यावेळी बोलताना केला. तसेच लॉकडाऊन हवा आहे, असे म्हणणाऱ्या अस्लम शेख यांनी मालवणी या त्यांच्या मतदारसंघात जाऊन आधी पाहावे. किती लोकं नियम पाळतात, मास्क किती जण घालतात, याचा आढावा घ्यावा, असा टोला संदीप देशपांडे यांनी यावेळी बोलताना लगावला.