मुरगूडमध्ये वृद्धाश्रमाच्या नावाने देणगी मागणाऱ्यांचा पर्दाफाश

निकाल न्यूज प्रतिनिधी : विजय मोरबाळे
मुरगूड येथील सरपिराजीराव रोडवर सकाळच्या वेळी एक गाडी स्पीकर वरून वृद्धाश्रमाला मदत करा, असे आवाहन करत फिरत होती. यामध्ये एक महिला हातामध्ये कन्नड अक्षरे असलेली फाईल घेऊन घरोघरी जुने कपडे व धान्य मागत फिरत असताना त्याचा संशय आल्यामुळे सर्जेराव भाट आणि ओंकार पोतदार यांनी त्यांना अडवून त्यांच्याकडे असलेल्या परवाना, संस्थेची कागदपत्रे यांची चौकशी केली. यावेळी त्यांनी उडवा उडवीची उत्तरे दिली.
खोट्या नावाने देणगी मागणे तसेच चोरीच्या इराद्याने फिरणे असा संशय शिवभक्तांना आल्याने त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. आम्हाला मराठी भाषा बोलता येत नाही, त्यामुळे तुम्ही कन्नडमध्ये बोला असे सांगितले. तसेच आपल्या साथीदाराला फोन लावून त्याच्याशी बोलण्यास भाग पाडण्याचा प्रयत्न केला. त्यांचा हा डाव शिवभक्तांनी उलटवून लावला.
पोलिसांची भीती दाखवल्यानंतर त्यांनी आपल्याकडे कोणताही परवाना नसल्याचे तसेच आम्ही फक्त कर्नाटक भागातच मागू शकतो, असे सांगितले. त्यावर संतप्त झालेल्या शिवभक्तांनी कर्नाटकामध्ये परत जा, असे सांगितले. पुन्हा असा प्रकार केल्यास पोलिसांच्या ताब्यात देण्याचा इशारा दिला. यावर त्यांनी मुरगडमधून काढता पाय घेतला.