Breaking News : 5 हजाराची लाच घेताना तलाठी अन् ग्रामपंचायत कर्मचारी अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

नदीतून काढलेल्या बेकायदेशीर वाळूची कारवाई न करण्यासाठी पाच हजाराची लाच स्वीकारणाऱ्या ग्रामपंचायत कर्मचारी व तलाठ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. एसीबीच्या पथकाने ही कारवाई सोमवारी (दि.17) केली. त्यांच्यावर मंगळवेढा पोलीस ठाण्यात गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.
बठाण ग्रामपंचायत कर्मचारी श्रीमंत मसाजी भालेराव (वय-50 रा. मु.पो. बठाण, मंगळवेढा, जि. सोलापूर) व तलाठी सज्जा मुडबी तसेच अतिरिक्त कार्यभार सजा बठाण गजानन शंकरराव चाफेकर (वय-32 मूळ रा. मु.पो. उमरवटी, ता. मुखेड, जि. नांदेड. सध्या रा. बाजार समितीच्या पाठीमागे मंगळवेढा, जि. सोलापूर) असे एसीबीच्या पथकाने रंगेहाथ पकडलेल्या दोघांची नावे आहेत.
तक्रारदार यांच्या घराचे बांधकाम चालू असून, बांधकामासाठी वाळु कमी पडल्याने, तक्रारदार यांनी त्यांच्या गावाजवळुन मौजे बठाण हद्दीतून जाणाऱ्या नदीतून वाळू काढली. वाळु काढल्यामुळे तक्रारदार यांच्यावर कारवाई न करण्यासाठी 5 हजार रुपये लाचेची मागणी केली. याबाबत तक्रारदार यांनी सोलापूर एसीबीकडे तक्रार केली. एसीबीच्या पथकाने शुक्रवारी (दि.14) पडताळणी केली. पडताळणीमध्ये भालेराव आणि चाफेकर यांनी तक्रारदार यांच्याकडे 5 हजार रुपये लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले.
अधिकाऱ्यांनी आज (सोमवार) सापळा रचला. तक्रारदार यांच्याकडून 5 हजार रुपये लाच घेताना श्रीमंत भालेराव याला रंगेहात पकडण्यात आले. त्यानंतर तलाठी गजानन चाफेकर याला ताब्यात घेण्यात आले. त्यांच्यावर सोलापूर ग्रामीणच्या मंगळवेढा पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे ,अपर पोलीस अधीक्षक डॉ. शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर एसीबीचे पोलीस उप अधीक्षक गणेश कुंभार , पोलीस निरीक्षक चंद्रकांत कोळी , पोलीस अंमलदार प्रमोद पकाले, संतोष नरोटे, गजानन किणगी, राहुल गायकवाड यांच्या पथकाने केली.