चांगल्याचे कौतुक आणि चुकीचे वाभाडे काढणारी पत्रकारिता समाजहिताची असते – तात्यासाहेब मोरे

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
चांगल्याचे कौतुक अन चुकीचे वाभाडे काढणारी पत्रकारिता असावी ती समाज हिताची असते असे प्रतिपादन तात्यासाहेब मोरे यांनी केले ते मुरगूड शहर पत्रकार संघाच्या वतीने आयोजित पत्रकार दिनाच्या कार्यक्रम प्रसंगी बोलत होते.
मुरगूड नगरपरिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये घेण्यात आलेल्या या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मुरगूड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक आतिश वाळुंज हे होते. एपीआय शिवाजीराव करे, ग्रामीण रुग्णालय अधीक्षक भगवान डवरी, मंडलिक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ शिवाजीराव होडगे, ज्येष्ठ पत्रकार चंद्रकांत माळवदे, व्ही आर भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला.
याप्रसंगी एपीआय शिवाजीराव करे यांच्या हस्ते दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
यावेळी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल प्रा रवींद्र शिंदे यांचा,सचिवपदी निवड झाल्याबद्दल वृक्षमित्र प्रवीण सूर्यवंशी यांचा,तसेच राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार प्राप्तीबद्दल सुनील डेळेकर यांचा शाल श्रीफळ बुके देऊन सत्कार करण्यात आला.
पत्रकार संघात नव्याने समाविष्ट झालेल्या पत्रकार ओमकार पोतदार,शशीकांत दरेकर, विजय मोरबाळे यांचे मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
श्री तात्यासाहेब मोरे म्हणाले, हल्ले होऊनही निर्भीडपणे पत्रकारिता करणारा मुरगूडचा पत्रकार संघ खरोखरी कौतुकास मात्र आहे. मराठी वृत्तपत्रकारितेचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरु केलेले दर्पण वृत्तपत्रे लोक जागृतीचे साधन होते. त्याप्रमाणे घरगुती वापराचा गॅस प्रश्न असेल किंवा निपाणी फोंडा मार्गाचे बांधकाम असेल अशा सामाजिक प्रश्नासाठी रस्त्यावर उतरून समाजाच्या हितासाठी कार्य करणारा मुरगूडचा पत्रकार संघ समाजासाठी एक जागल्या आहे.
या कार्यक्रमास प्रा चंद्रकांत जाधव, समाजवादी प्रबोधिनी माजी अध्यक्ष बी एस खामकर,काॅ. बबन बारदेस्कर रंगराव चौगले, वृत्तपत्र विक्रेते पप्पू बारदेस्कर, गणेश नागरी पतसंस्था सभापती सोमनाथ यरनाळकर, प्रदीप वर्णे, जयवंत हावळ, भिकाजी कांबळे, अमर कांबळे, आदींसह मुरगूड मधील सामाजिक चळवळीतील कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.
स्वागत प्राचार्य एस पी पाटील यांनी, प्रास्ताविक प्रा रवींद्र शिंदे यांनी, सूत्रसंचालन प्रा अनिल पाटील यांनी तर आभार प्रवीण सूर्यवंशी यांनी मानले.