25 हजार रुपये लाच घेताना उपनिबंधक कार्यालयातील मुख्यलिपीक अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

सोसायटीची कामे करण्यासाठी 50 हजार रुपये लाचेची मागणी करुन 25 हजार रुपये लाच स्वीकारताना भाईंदर तालुक्यातील उपनिबंधक सहकारी संस्थेतील मुख्यलिपीकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहाथ पकडले. अलीहैदर दगडुमिया शेख (वय-35) असे लाच घेताना पकडण्यात आलेल्या लाचखोर कर्मचाऱ्याचे नाव आहे. एसबीने ही कारवाई मंगळवारी (दि.29) उपनिबंधक सहकारी सस्था ठाणे येथे केली.
याबाबत तक्रारदार यांनी सोमवारी (दि.28) ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. तक्रारदार यांच्या सोसायटी विरुद्ध नोटीस काण्यासाठी, प्रशासक नेमण्यासाठी तसेच बिल्डिंगचे लेखापरीक्षण करण्यासाठी अलीहैदर शेख याने तक्रारदार यांच्याकडे 50 हजार रुपये लाच मागितली. तक्रारदार यांनी याबाबत ठाणे एसीबीकडे तक्रार केली.
एसीबीच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी पंचासमक्ष पडताळणी केली असता अलीहैदर शेख याने तक्रारदार यांच्याकडे तडजोडी अंती 45 हजार रुपये लाचेची मागणी केली. त्यापैकी पहिला हप्ता 25 हजार रुपये स्वीकारताना शेख याला रंगेहाथ पकडण्यात आले. शेख याच्यावर भाईंदर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई ठाणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक सुनिल लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे एसीबीच्या पथकाने केली.