ताज्या बातम्यामहाराष्ट्र

पन्हाळा : पाणी वेळेत सोडा ; कळे-खेरीवडेच्या महिलांची ग्रामसभेत मागणी

कळे-वार्ताहर : अनिल सुतार

पाणी वेळेत येत नसल्याने महिलांना कुठेही कामावर जाता येत नाही.तसेच त्यामुळे कुटुंबालाही हातभार लागत नाही. त्यामुळे पाणी वेळेत सोडण्याची मागणी कसबा कळे-खेरीवडे (ता.पन्हाळा) च्या महिला ग्रामसभेत महिलांनी लावून धरली. अध्यक्षस्थानी सरपंच सुभाष पाटील होते.

गावात चावीला पिण्याचे पाणी येते. पण ते सोडण्याची कोणतीच वेळ निश्चित नाही. कधी सकाळी, कधी दुपारी तर कधी संध्याकाळी पाणी येते. त्यामुळे महिलांना बाहेर कुठेही जाता येत नाही. अगदीच गरज पडली तर शाळेच्या मुलांना घरी थांबवावे लागते. कुटुंबाला हातभार लागावा म्हणून कामावर जायचे म्हटले तर तेही शक्य होत नाही. दिवसभर अडचणून बसायची वेळ येते. परिणामी कुटुंबाची आर्थिक परिस्थितीही सुधारत नाही. घरी दुसऱ्या कुठल्या कामाला हात लागत नाही.

त्यामुळे चावीला पाणी सकाळी नऊच्या आत ठरलेल्या वेळेत सोडण्याची मागणी नंदा नाईक व गौरी माळवी यांच्यासह महिलांनी केली.यावर लवकरच तोडगा काढू असे सरपंच सुभाष पाटील यांनी सांगितले.

महिलांना स्वयंरोजगारासाठी ग्रामपंचायतीने एखादे प्रशिक्षण शिबीर राबविण्याची मागणी नंदा संजय नाईक यांनी केली. एसटी थांब्याच्या ठिकाणी सार्वजनिक शौचालय व मुतारी बांधण्याची गरज असल्याचे मत काहींनी व्यक्त केले. प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणारा मार्ग आठवडी बाजारावेळी बंद राहतो. तो खुला करण्याचा प्रयत्न ग्रामपंचायतीने केला असला तरी व्यावसायिक पुन्हा दुकाने मांडतात.

रुग्णवाहिकेला हा मार्ग मोकळा राहणे आवश्यक आहे. अशी मागणी जयश्री बोरगे यांनी केली. ग्रामसंघासाठी ग्रामपंचायतीने खोली उपलब्ध करून देण्याची मागणी गौरी माळवे यांनी केली. पेट्रोल पंपाकडे जाण्याऱ्या मार्गावर दुतर्फा गटारी बांधण्याची मागणी मंगल देसाई, शारदा देसाई, सुप्रिया देसाई, सुवर्णा देसाई, सुरेखा पाटील , उज्वला पाटील, विजया देसाई, शोभा पाटील, शुभांगी देसाई आदी महिलांनी अर्जाद्वारे केली. बचत गट समन्वयक रघुनाथ चौगले यांनी महिला बचत गटांची माहिती दिली.

उपसरपंच छाया झुरे, सरिता पाटील, विद्या गुरव, साऊबाई शिखरे, सविता पाटील, राजश्री डांगे, सदस्या संध्या देसाई, सुरेखा बेलेकर, रूपाली देसाई यांच्यासह महिला उपस्थित होत्या. ग्रामविकास अधिकारी राजेंद्र पाटील यांनी विषयांचे वाचन केले.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks