दि फेडरल बँकेचे लसीकरणात योगदान मोठे; ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचे प्रतिपादन; बँकेच्या सीएसआर फंडातून दोन हजार मोफत डोस.

कोल्हापूर :
दि फेडरल बँकेचे मोफत लसीकरणातील योगदान मोठे असल्याचे प्रतिपादन, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. बँकेच्या सीएसआर फंडामधून दोन हजार मोफत डोस जनतेला दिले आहेत, असेही ते म्हणाले.
कोल्हापुरात फेडरल बँकेच्या फेडरल स्किल अकॅडमीमध्ये मोफत लसीकरण कार्यक्रमात मंत्री श्री. मुश्रीफ प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी केडीसीसी बँकेच्या कल्याण निधीमधून कर्मचाऱ्यांना द्यावयाच्या मोफत कोव्हीशिल्ड लसीकरणाचा प्रारंभही झाला.
स्वागतपर भाषणात दि फेडरल बँकेचे रिजनल हेड अजित देशपांडे म्हणाले, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचे आमच्या बँकेच्या वाटचालीत नेहमीच मोठे सहकार्य आहे. केडीसीसी बँकेचे संचालक असिफ फरास म्हणाले, संजीवनी अभियानांतर्गत फेडरल बँकेने जनतेला दोन हजार डोस मोफत दिले आहेत, ही बाब कौतुकास्पद आहे.
यावेळी माजी खासदार श्रीमती निवेदिता माने, आमदार राजेश पाटील, आर. के. पवार, विलासराव गाताडे, श्रीमती उदयानीदेवी साळुंखे, बाबासाहेब पाटील -आसुर्लेकर, प्रताप उर्फ भैय्या माने, असिफ फरास, निशा थोरात, मोहन कुंभार, अजित कुलकर्णी, श्री. कदम, जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ए. बी. माने, प्रशासन अधिकारी जी.एम शिंदे आदी प्रमुख उपस्थित होते.
ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, दि फेडरल बँकेने सामाजिक जाणिवेच्या माध्यमातून केलेले कार्य खूप मोठे आहे. २०१९ च्या महापुरातील पडझड झालेल्या घरे व शाळांची उभारणी या बँकेने केली आहे. तसेच फेडरल स्किल अकॅडमीच्या माध्यमातून बेरोजगार युवकांना रोजगार व उद्योगधंद्याचे प्रशिक्षण देण्यातही या बँकेने फार मोठा वाटा उचललेला आहे.